वाचनालये नावापुरतीच : इमारतींची दुर्दशा : पुस्तकांच्या अभावाने वाचकांची पाठ : असुविधांमुळे वाचनसंस्कृतीला खीळ
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील सार्वजनिक ग्रंथालयांकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रंथालयांची अवस्था बिकट बनली आहे. सुविधा आणि देखभालीअभावी ग्रंथालयांना उतरती कळा लागली आहे. सुविधांअभावी वाचनालयातील पुस्तके धूळखात पडली असून, वाचन संस्कृतीला खीळ बसली आहे. त्यामुळे वाचनप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हय़ात 464 सार्वजनिक वाचनालये आहेत. या वाचनालयांच्या देखभालीची जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे. मात्र, अनुदानाअभावी वाचनालयांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाचकांनी वाचन कुठे करावे, हा प्रश्न पडला आहे. वाचन संस्कृती रुजावी, यासाठी शासनाने गावोगावी सार्वजनिक वाचनालये स्थापन केली. मात्र, सुविधा आणि देखभालीअभावी काही दिवसांत या वाचनालयांची दुर्दशा झाली आहे. बहुतांशी वाचनालयांच्या इमारतींची पडझड झाली आहे. त्यामुळे पुस्तकेदेखील खराब झाली आहेत. पुस्तके वाचविण्यासाठीच ग्रंथपालांची धडपड सुरू आहे. ग्रामीण विकास आणि पंचायतराज खात्याच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढविली आहे.
मराठी गावात मराठी पुस्तके उपलब्ध करा
जिल्हय़ातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे वाचन करणे धोक्मयाचे बनले आहे. काही ठिकाणी ग्रंथालये भाडेतत्त्वावर आहेत. ती बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे वाचकांची संख्या झपाटय़ाने घटली आहे. अशा ग्रंथालयांचा सर्व्हे करून त्या इमारती दुरुस्त कराव्यात, अशी मागणी होत आहे. काही ग्रंथालयांमध्ये पुस्तकांचा अभाव आहे. मराठीबहुल भागात असलेल्या वाचनालयात कानडी पुस्तकांचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वाचनालये ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे मराठी गावात असलेल्या ग्रंथालयात मराठी पुस्तके उपलब्ध करावीत, अशी मागणी मराठी भाषिकांतून होत आहे.
बहुतांशी ग्रंथालयात शैक्षणिक पुस्तके नसल्याने गैरसोय
बहुतांशी ग्रंथालयात शैक्षणिक पुस्तके नसल्याने विद्यार्थ्यांना शहर गाठावे लागत आहे. स्पर्धा परीक्षांची पुस्तके नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अनावश्यक पुस्तकांचाच भरणा अधिक असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सौंदत्ती, रामदुर्ग आणि चिकोडी तालुक्मयातील वाचनालयांमध्ये पुस्तकांचा अभाव आहे. शिवाय काही ठिकाणी असलेल्या डिजिटल ग्रंथालयांमध्ये पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही ग्रंथालये दिवसभर कुलूपबंद असतात. त्यामुळे वाचकांनी पुस्तके कशी घ्यावीत? असा प्रश्न पडला आहे.
खानापूर तालुक्यात मराठी भागात कन्नड पुस्तके
खानापूर तालुक्मयात 40 गंथालये आहेत. ती सर्व मराठी गावांमध्ये आहेत. मात्र, या ग्रंथालयांमध्ये सर्व कन्नड पुस्तकांचा भरणा करण्यात आला. त्यामुळे मराठी भाषिकांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय ग्रंथालये ही कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे ज्या भागात मराठी भाषिक आहेत, त्या ठिकाणी मराठी पुस्तके उपलब्ध करावीत, अशी मागणी होत आहे.
ग्रा.पं. स्तरावर डिजिटल ग्रंथालये
ग्रामपंचायत स्तरावर 132 डिजिटल ग्रंथालये सुरू करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी संगणक, बुद्धिबळ, कॅरम आणि विविध पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाव मिळत आहे. विविध साहित्य प्रकार आणि तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांची पुस्तके ठेवली असल्याचे जिल्हा पंचायतीचे सीईओ दर्शन एच. व्ही. यांनी सांगितले.