केवळ विचाराने हाताळता येणार मोबाइल
अंध व्यक्तीही पाहू शकणार
आगामी काळात एका चिपद्वारे अंध व्यक्तीही पाहू शकेल, अर्धांगवायूने ग्रस्त माणूस केवळ मेंदूत विचार करून मोबाइल आणि संगणक हाताळू शकणार असल्याचा दावा जगातील सर्वात धनाढय़ व्यक्ती आणि नूरालिंकचे संस्थापक एलन मस्क यांनी केला आहे. त्यांनी न्यूरालिंकच्या कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात ‘शो अँड टेल’ सोहळय़ात स्वतःच्या या उपकरणाची माहिती दिली आहे.
ब्रेन चिप इंटरफेस स्टार्टअपकडून विकसित वायरलेस उपकरण 6 महिन्यात मानवी परीक्षणासाठी सज्ज होणार आहे. याकरता फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनकडे कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. या सोहळय़ात मस्क यांनी जॉयस्टिकचा वापर न करता एका माकड पिनबॉल खेळतानाचा व्हिडिओ दाखविण्यात आला. टेलिपथीद्वारे माकडाने टायपिंगही केले. न्यूरालिंक टीमने स्वतःच्या सर्जिकल रोबोटचेही सादरीकरण केले आहे.
मोबाइलला थेट मेंदूशी जोडणार
न्यूरालिंकने नाण्याच्या आकारातील एक उपकरण तयार केले असून त्याला ‘लिंक’ नाव दिले आहे. हे उपकरण संगणक, मोबाइल किंवा अन्य कुठल्याही उपकरणाला ब्रेन ऍक्टिव्हिटी (न्यूरल इम्पल्स)द्वारे थेट नियंत्रित करण्यास सक्षम करते. पॅरालिसिसने पीडित व्यक्ती मेंदूत चिप प्रत्यारोपित करण्यात आल्यावर केवळ विचार करून माउसचा कर्सर हलवू शकणार आहे. न्यूरालिंक ऍपही डिझाइन करण्यात आला असून याद्वारे ब्रेन ऍक्टिव्हिटीला थेट स्वतःचा कीबोर्ड आणि माउसला केवळ विचार करून नियंत्रित करता येणार आहे. हे उपकरण चार्ज करण्याची गरज असल्याने कॉम्पॅक्ट इंडक्टिव्ह चार्जर तयार करण्यात आला असून तो बॅटरीला बाहेरून चार्ज करण्यासाठी वायरलेस पद्धतीने इम्प्लांटशी जोडला जाणार आहे.
क्रांती घडविणार
आमच्या तंत्रज्ञानाचे प्रारंभिक लक्ष्य पॅरालिसिसने ग्रस्त लोकांना संगणक आणि मोबाइलचे नियंत्रण मिळवून देणे आहे. अशा लोकांना आम्ही स्वयंनिर्भर करू इच्छितो. या तंत्रज्ञानात अनेक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरवर उपचार करण्याची क्ष्मता असल्याचे आमचे मानणे असल्याचे न्यूरालिंकने म्हटले आहे.