‘फायनान्स ट्रक’ अजेंडय़ावर होणार चर्चा ः भारताकडे जी-20चे अध्यक्षत्व
वृत्तसंस्था / बेंगळूर
भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली अर्थ तसेच मध्यवर्ती बँकांच्या उपप्रमुखांची (एफसीबीडी) पहिली बैठक बेंगळूर शहरात 13-15 डिसेंबरदरम्यान पार पडणार आहे. जी-20चे अध्यक्ष म्हणून भारताच्या या पहिल्या बैठकीद्वारे ‘फायनान्स ट्रक’ अजेंडय़ावर चर्चेस प्रारंभ होणार आहे. बैठकीचे अध्यक्षत्व अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक संयुक्तपणे सांभाळणार आहे. जी-20 देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या डेप्युटी गव्हर्नरांच्या नेतृत्वाखालील ‘जी-20 फायनान्स ट्रक’मध्ये आर्थिक आणि वित्तीय विषयांवर विचारविनिमय केला जाणार असल्याचे अधिकृत वक्तव्यात म्हटले गेले आहे.
जागतिक आर्थिक विचारविनिमय तसेच धोरण समन्वयासाठी जी-20 ची बैठक एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करणार आहे. अर्थमंत्री अणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची पहिली बैठक 23-25 फेब्रुवारीदरम्यान बेंगळूरमध्येच होणार आहे. तर जी-20 ची वित्तीय आणि मध्यवर्ती बँकेच्या उपप्रमुखांच्या आगामी बैठकीचे सह-अध्यक्षत्व आर्थिक विषयक विभागाचे सचिव अजय सेठ आणि आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. मायकल पात्रा करणार आहेत. 21 व्या शतकातील जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बहुपक्षी विकास बँकांना मजबूत करण्यासंबंधी या बैठकीच्या व्यतिरिक्त एका संवादसत्रात चर्चा केली जाणार आहे.