36 वे लढाऊ विमान वायुदलाच्या ताफ्यात दाखल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्रान्ससोबत झालेल्या कराराच्या अंतर्गत 36 वे राफेल लढाऊ विमान गुरुवारी भारताला प्राप्त झाले आहे. भारतात अखेरचे आणि 36 वे राफेल विमान लँड होताच फ्रान्सकडून कराराची पूर्तता झाली आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये मिड-एअर रिफ्यूलिंग करविल्यावर राफेल विमान भारतात पोहोचले आहे.
भारताने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्ससोबत 59,000 कोटी रुपये खर्चुन 36 राफेल विमानांच्या खरेदीसाठी एक आंतर-सरकारी करारावर स्वाक्षरी केली होती. पहिले राफेल विमान मागील वर्षी जुलै महिन्यात प्राप्त झाले होते. 36 व्या राफेल विमानाने फ्रान्समधून उड्डाण केल्यावर संयुक्त अरब अमिरातच्या विमानाद्वारे आकाशातच इंधन प्राप्त केले आणि त्यानंतर ते भारतात लँड झाल्याची माहिती वायुदलाने दिली आहे. भारतात यापूर्वीच पोहोचलेल्या 35 राफेल विमानांना हरियाणातील अंबाला तसेच पश्चिम बंगाल हाशिमारा वायुतळावर तैनात करण्यात आले आहे. 36 व्या राफेल विमानात काही आणखी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंर्तभाव करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
राफेल लढाऊ विमानाची इंधनक्षमता सुमारे 17 हजार किलोग्रॅम इतकी आहे. या विमानाची मारकक्षमता 3,700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पचा मारक पल्ला 300 किलोमीटर आहे. राफेल लढाऊ विमान 2,223 किलोमीटर प्रतितासाचा वेग गाठू शकते. याला मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट या नावानेही ओळखले जाते.