वार्ताहर/ माशेल
खांडोळा गणेशनगर येथील लक्ष्मी नारायण सभागृहाचे उद्घाटन आज रविवार दि. 18 रोजी सायं. 4 वा. क्रीडा, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी तिवरे जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, बेतकी खांडोळाचे सरपंच विशांत नाईक, मालक प्रसाद नारायण बर्वे, सुभाष नारायण बर्वे तसेच त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे.
सदर लक्ष्मी नारायण सभागृह माशेल येथील मुख्य रस्त्यापासून सुमारे तीनशे ते साडेतीनशे मीटर अंतरावर आहे. वळवई, बेतकी रस्त्याच्या बाजूला ग्रीन माशेलच्यासमोर मध्यवर्ती ठिकाणी आहे. सदर सभागृह वातानुकूलित असून प्रशस्त आहे. त्यात पाचशे खुर्च्यांची व्यवस्था, चांगले व्यासपीठ, व्यासपीठाच्या बाजूला वधू-वरासाठी स्वतंत्र दोन सर्व सोयी असलेल्या खोल्या आहेत. तळमजल्यावर कॅटरिंगसाठी प्रशस्त सभागृह आहे. सभागृहाच्या चारही बाजूला हिरवळ, झाडे असून जागा हवेशीर आहे. सभागृहाच्या बाहेर चांगली पार्किंग व्यवस्था तसेच विद्युत व्यवस्थाही आहे. सभागृह व्हेज, नॉनव्हेज पार्टी, लग्न, मुंजीसारख्या सर्व कार्यासाठी सोयीस्कर आहे.
सदर सभागृहाचे मालक प्रसाद नारायण बर्वे व सुभाष नारायण बर्वे असून कुलदेवीच्या व आराध्य देवीच्या कृपेने आज नवीन वास्तूचे उद्घाटन करीत असल्याचे सांगून या सोहळय़ाला सर्वांनी उपस्थित राहून आशीर्वाद द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.