चिपळुणातील प्रकार; बँकेतील अपहार प्रकरणातील संशयित आरोपीचा लॅपटॉप आणल्याचा आरोप; शहरात खळबळ
चिपळूण प्रतिनिधी
चिपळूण अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व दोन संचालकांवर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंकेत झालेल्या अपहार प्रकरणातील संशयित आरोपीच्या घरातून जाऊन त्याचा लॅपटॉप आणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बंकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच हा गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
नीलेश आत्माराम भुरण (खेर्डी,), दीपक प्रभाकर विखारे (बाजारपेठ), संतोष विजय देसाई (कराड, सध्या खेंड-चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील भुरण व विखारे हे संचालक, तर देसाई हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. याची तक्रार राहूल रमेश सुर्वे (खेर्डी) याने दिली आहे. बॅंकेत काही लाखांचा अपहार झाला आहे. या प्रकरणी सुर्वे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही झाली होती.
असे असताना 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.48 वाजता भुरण व विखारे हे सुर्वे यांच्या सती येथील घरी गेले. यावेळी घरात त्याची आई व पत्नी होती. त्यांना आम्ही बंकेतून आलो आहोत, सुर्वे याने लॅपटॉप मागितला आहे, असे खोटे सांगून तो घेऊन गेले. त्यानंतर देसाई यांनी हा लॅपटॉप आपल्याकडे असल्याचे सुर्वे याला सांगितले. त्यामुळे लॅपटॉप घेण्यासाठी सुर्वे, त्याची आई व पत्नीचा विश्वासघात केल्याप्रकरणी वरील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळातच अर्बन बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू असताना अपहार झाल्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली होती. त्यातच आता खऱया अर्थाने निवडणुकीची धामधूम सुरू असताना 2 संचालक व मुख्य कार्यकारी अधिकाऱयांवर गुन्हा दाखल झाल्याने येथे आणखीनच खळबळ उडाली आहे.