भाडेकराराची मुदत संपल्याने कारवाई : व्यापारी संकुल-पार्किंगतळाची होणार उभारणी
प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी, देशमुख रोडवरील रेल्वेफाटकाजवळ असलेल्या महापालिकेच्या जागेत व्यापारी संकुल आणि पार्किंगतळाची उभारणी करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता येथील जीर्ण झालेली 6 दुकाने हटविण्याची कारवाई शुक्रवारी महापालिकेने केली. या गाळ्यांमध्ये काही व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू केले होते. मात्र भाडेकराराची मुदत संपल्याने गाळेधारकांना हटवून गाळे पाडण्यात आले.
टिळकवाडी तसेच ठिकठिकाणी असलेल्या खुल्या जागा भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांवर व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात आली होती. तसेच गाळ्यांची उभारणी केली होती. सदर गाळ्यांच्या भाडेकराराची मुदत संपली होती. पण खुल्या जागांवरील भाडेकरू आणि व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी जागा आणि गाळ्यांचा ताबा महापालिकेकडे दिला नव्हता. त्यामुळे काही खुल्या जागा आणि गाळ्यांचा ताबा महापालिकेने घेतला होता.
भाडेतत्त्वावर दिलेल्या खुल्या जागा आणि गाळे ताब्यात घेण्याची मोहीम महापालिकेने राबविली होती. त्यावेळी टिळकवाडी, देशमुख रोडवरील गाळ्यांमधील मुदत संपलेल्या भाडेकरूंना हटविण्यात आले होते. तसेच जीर्ण झालेल्या इमारती पाडण्यात आल्या होत्या. पण काही गाळेधारक न्यायालयात गेल्याने गाळ्यांचा ताबा घेता आला नाही. न्यायालयीन वाद संपुष्टात आल्यानंतर गाळे ताब्यात घेण्यात आले होते. महापालिकेने सदर गाळ्यांच्या इमारतींची चाचपणी केली असता इमारत जीर्ण झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे सदर गाळे हटविण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी गाळे हटविण्यासाठी प्रयत्न झाले होते. पण काही तांत्रिक अडचणींमुळे गाळे हटविण्यात आले नाहीत.
मात्र सदर गाळे हटविण्यासाठी शुक्रवारी मुहूर्त मिळाला आहे. नगरयोजना अधिकारी बसवराज हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगरयोजना विभागाच्या अभियंत्यांच्या पथकाची नियुक्ती कारवाईसाठी करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी 10 वाजता सदर इमारत हटविण्यासाठी मनपाकडून कारवाई सुरू करण्यात आली. या ठिकाणी असलेले 6 गाळे हटविण्यात आले. मुदत संपल्यानंतरही काही गाळेधारकांनी व्यवसाय सुरू ठेवला होता. सदर गाळेधारकांना हटवून महापालिकेने ही कारवाई पूर्ण केली.