गौरव कुडचडकर यांचे प्रतिपादन
वार्ताहर /मडकई
विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण दिल्यास त्यांच्यातील माणूस खऱया अर्थांने जागृत होईल. भविष्यात त्यांचे हे ज्ञान सत्कारणी लागेल व ते समाजात आदर्श नागरिक बनतील. विद्यार्थ्यांना ज्ञानाधिष्ठीत शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन डेक्कन फाईन केमिकल या आस्थापनाचे व्यवस्थापक गौरव कुडचडकर यांनी केले.
भोम येथील महानंदू ग. नाईक मेमोरिअल हायस्कलच्या स्नेहसंमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर स्थानिक सरपंच दामोदर नाईक, माजी सरपंच सुनिल जल्मी, पंचसदस्य अब्दुल खान, व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष महाबळेश्वर फडते गावंकर, व्यवस्थापक दामोदर फडते, मुख्याध्यापिका मेधा देसाई, विशांन नाईक, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष वासुदेव फडते गावंकर आदी मान्यवर उपस्थीत होते. ‘विद्या विनयाने शोभते’ या उक्तीनुसार शिक्षणातून ज्ञान संपन्न होतानाच त्याला कला क्रीडेची जोड द्या व आपले भवितव्य घडवा असे, श्री. कुडचडकर पुढे म्हणाले.
सरपंच दामोदर नाईक म्हणाले, शिक्षक व आईवडील यांचा आदर व मान राखणे हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यांचे मार्गदर्शन व आशिर्वादानेच आपण पुढे जाऊ शकतो. खरे शिक्षण तेच असते, ज्यात नम्रता असते.
सुनिल जल्मी, अब्दुल खान, महाबळेश्वर फडते गावंकर यांची यावेळी भाषणे झाली. स्वागत व प्रास्तावीक मुख्याध्यापिका मेधा देसाई यांनी केले. विविध स्पर्धातील विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. त्यांचे श्रेयनामावली अपर्णा वळईकर, प्रदीप धुळापकर, समृद्धी परब यांनी सादर केली.
उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून शिवानी गावडे व साईराज गावडे, शिस्तबद्ध विद्यार्थी म्हणून सत्यम गावडे व सना गावडे तर सर्वांत्कृष्ट खेळाडू म्हणून आतीश गावडे व खुशी यांची यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिमा कुंकळकर यांनी केले. त्यानतंर विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले.