इमारतींची उभारणी करून दोन वर्षे लोटली : अद्यापही स्वच्छता कामगारांना घरांचा ताबा नसल्याने नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या स्वच्छता कामगारांसाठी आझमनगर येथे पी. के. क्वॉर्टर्सच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतोची उभारणी करुन दोन वर्षे होत आली. पण अद्यापही येथील घरांचा ताबा स्वच्छता कामगारांना देण्यात आला नाही. त्यामुळे गाळ्यांचा ताबा स्वच्छता कामगारांना कधी देणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
महापालिका व्याप्तीमधील स्वच्छता कामासाठी कर्मचारी घेण्यात आले आहेत. या स्वच्छता कामगारांना पहाटे 5 पासून काम करावे लागते. त्यामुळे त्यांना राहण्याची सुविधा महापालिकेकडून करून देण्यात येते. यापूर्वी आनंदवाडी येथे पी. के. क्वॉर्टर्स निर्माण करुन स्वच्छता कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. तसेच आझमनगर येथे देखील स्वच्छता कामगारांना घरे बांधून देण्यात आली होती. मात्र पी. के. क्वॉर्टर्सच्या इमारती जीर्ण झाल्याने घरे रिकामी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. अन्यत्र राहण्याची सुविधा नसल्याने राहती घरे स्वच्छता कामगारांना कायमस्वरुपी देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली होती.
सर्व कामगारांना घरे दिली तरच घरांमध्ये प्रवेश
महापालिकेने नेहरूनगर येथील खुल्या जागेत तीन इमारती उभारल्या असून सदर काम पूर्ण होवून दोन वर्षे होत आली. पण या घरांचा ताबा स्वच्छता कामगारांना देण्यात आला नाही. या ठिकाणी तीन इमारतींची उभारणी 48 घरे निर्माण करण्यात आली आहेत. ही घरे कोणत्या कामगारांना मंजूर करायची? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. सर्व कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यात यावीत, त्यानंतरच या घरांमध्ये जावू, अशी भूमिका स्वच्छता कामगारांनी घेतली होती.
आणखीन 8 पी. के. क्वॉर्टर्स इमारतींच्या उभारणीचे काम हाती
त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी आणखीन 8 पी. के. क्वॉर्टर्सच्या इमारतींच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. सर्व इमारतींमध्ये 128 स्वच्छता कामगारांना राहण्याची व्यवस्था होवू शकते. पण या इमारतींचे काम पूर्ण होण्यास अद्याप काही महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. सध्या तयार असलेली घरे धूळखात पडली आहेत. या घरांचा ताबा स्वच्छता कामगारांना कधी देणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.