प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा कौटुंबिक न्यायालयासाठी नूतन इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. कौटुंबिक न्यायालयामध्ये मोठ्या संख्येने खटले दाखल होत आहेत. त्यामुळे आणखी एक न्यायालय मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता या नवीन इमारतीमध्ये दोन जिल्हा कौटुंबिक न्यायालयाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या इमारतीचे उद्घाटन शनिवार दि. 21 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
सध्या सर्वात जास्त खटले हे कौटुंबिक न्यायालयामध्ये दाखल होत आहेत. जवळपास अडीच हजारांहून अधिक खटले दाखल झाले आहेत. त्यामुळे अतिरिक्त न्यायालय सुरू करण्यात आले आहे. मुख्य जिल्हा कौटुंबिक न्यायालय आणि पहिले अतिरिक्त मुख्य जिल्हासत्र न्यायालय अशी दोन न्यायालये या नूतन इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार आहेत.
कौटुंबिक वाद असू दे किंवा पती, पत्नींमधील वाद असू दे, याबाबतच्या खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रेमविवाहांच्या घटनांबराब्sारच आता घटस्फोटाचे खटलेदेखील वाढू लागले आहेत. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयामध्ये खटले दाखल होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. घटस्फोट, पोटगी दावे, मुले आई-वडिलांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे बऱ्याच मुलांचे आई -वडीलदेखील पोटगीसाठी खटले दाखल करत आहेत. त्यामुळे एका न्यायालयावर अधिक ताण पडत होता. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी आणखी एक न्यायालय सुरू करण्यात आले आहे.
या दोन्ही न्यायालयासाठी प्रशस्त अशी इमारत बांधण्यात आली आहे. त्या इमारतींमध्ये आधुनिक पद्धतीने बांधणी केली गेली आहे. प्रशस्त असा हॉल तसेच पक्षकारांना बसण्यासाठीदेखील उत्तम सोय करण्यात आली आहे. त्या इमारतीत आता या दोन्ही न्यायालयाचे कामकाज सुरू होणार आहे.