प्रतिनिधी /कारवार
कारवार, हल्याळ आणि सुपा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मंगळवार दि. 17 रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला. हुतात्मा दिनीनिमित्त मुख्य सभेचे आयोजन सदाशिवगड येथील सिद्धिविनायक देवस्थानच्या आवारात केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मराठीप्रेमी यशवंत दातेकर होते. सभेच्या सुरुवातीला हुतात्म्यांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हुतात्मे अमर रहे, रहेंगो तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे… आदी घोषणा देण्यात आल्या.
सदाशिवगड येथील कोकणी संस्कृती मंडळाच्या अध्यक्षा उषा उल्हास राणे म्हणाल्या, गेल्या 66 वर्षांपासून सीमाबांधव महाराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाही पद्धतीने अनेक लढे देत आहेत. तथापि आजअखेर या ज्वलंत प्रश्नावर सरकारने यशस्वी तोडगा काढलेला नाही. ही लोकशाहीची शोकांतिका आहे. ज्या सीमाबांधवांनी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी बलिदान दिले.
जोपर्यंत सीमाप्रश्न सोडविला जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांच्या आत्म्यांना शांतता मिळणार नाही, असे स्पष्ट करून त्या पुढे म्हणाल्या, सीमाबांधव पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठ्या अपेक्षा बाळगून आहेत. मोदी सरकार अस्तित्वात येऊन आठहून अधिक वर्षाचा कालावधी लोटला आहे. तथापि मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सीमाप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. ही खेदाची बाब म्हणावी लागेल. केंद्रात तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा तिन्ही ठिकाणी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे. किमान आता तरी या तिन्ही सरकारांनी एकत्र येऊन सीमाबांधवांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा जनतेच्या सरकारवरील विश्वास उडून जाईल, असेही त्यांनी सांगितले.
समितीचे सरचिटणीस दीपक देसाई म्हणाले, सहा दशकाहून अधिक काळ सीमाप्रश्न भिजत पडल्यामुळे सीमाभागातील मराठी शाळा, संस्कृती, परंपरा, भाषा अस्तित्व हरवून बसण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा भावी पिढी सरकारला माफ करणार नाही. केंद्र सरकारने आता बघ्याची भूमिका घेण्याऐवजी कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारांना विश्वासात घेऊन सीमाप्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे ते
म्हणाले. यावेळी नरेश राणे, संतोष कलंगुटकर यांची हुतात्म्यांना अभिवादनपर भाषणे झाली. यावेळी सुनील ऐगळ, चंद्रहास गिराप, संजय सावंत, संजना सावंत, लक्ष्मीकांत पडवळकर, सुमीत महालक्ष्मीकर, महेश सालसकर, के. पी. पेडणेकर, रॉयस्टन फर्नांडिस आदी उपस्थित होते.