पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडकडून पराभव, स्पेन उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले असून येथे झालेल्या क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा 5-4 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात स्पेनने मलेशियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. स्पेनची उपांत्यपूर्व लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी तर न्यूझीलंडची लढत विद्यमान विजेत्या बेल्जियमशी होईल. भारताची आता क्लासिफिकेशन लढत जपानविरुद्ध 26 जानेवारी रोजी होईल.
भारत व न्यूझीलंड यांच्यातील सामना निर्धारित वेळेत 3-3 असा बरोबरीत राहिला होता. चौथ्या सत्राच्या सुरुवातीपर्यंत भारताने 3-1 अशी आघाडी घेतली होती. पण ही आघाडी त्यांना राखता आली नाही. न्यूझीलंडने या सत्रात आणखी दोन गोल नोंदवत भारताशी बरोबरी साधली. निर्धारित वेळेत भारताचे गोल ललित उपाध्याय, सुखजीत सिंग व वरुण कुमार यांनी नोंदवले तर न्यूझीलंडचे गोल सॅम लेन, केन रसेल व सीन फिंडले यांनी पेनल्टी कॉर्नर्सवर नोंदवले. पेनल्टी शूटआऊटमध्ये तब्बल 18 शॉट्स घेण्यात आले. त्यात भारताने 4 तर न्यूझीलंडने 5 गोल नोंदवले. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताच्या अभिषेक, शमशेर, हरमनप्रीत सिंग, सुखजीत, शमशेर सिंग यांचे फटके हुकले तर न्यूझीलंड सॅम लेन, सॅम हिहा, निक वूड्स, फिलिप्स यांचे फटके हुकले. भारतातर्फे पेनल्टी शूटआऊटमध्ये हरमनप्रीत सिंग, राजकुमार, सुखजीत, राजकुमार यांनी गोल नोंदवले. भारताचे आव्हान संपुष्टात आल्याने आता क्लासिफिकेशन फेरीत खेळावे लागणार असून त्यांचा सामना जपानविरुद्ध 26 जानेवारी रोजी होणार आहे. न्यूझीलंडच्या सीन फिंडलेला सामनावीराचा बहुमान मिळाला.
स्पेनची मलेशियावर मात
अन्य एका सामन्यात स्पेनने मलेशियावर 4-3 अशी मात करून आगेकूच केली. या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. तिसऱया सत्रात 35 व्या मिनिटाला फैझल सारीने मलेशियाला आघाडीवर नेले. पण मार्क मिरालेसने 41 व्या मिनिटाला व झेवियर गिस्पर्टने 42 व्या मिनिटाला असे दोन झटपट गोल नोंदवत स्पेनला आघाडी मिळवून दिली. शेलो सिल्व्हेरियसने शानदार मैदानी गोल नोंदवत मलेशियाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली.
पेनल्टी शूटआऊटमध्ये पहिल्या पाचच्या सेटमध्ये 3-3 अशी बरोबरी झाली. यावेळी दोन्ही संघांकडून दोन फटके हुकले होते. यानंतर सडन डेथमध्ये स्पेनच्या मार्क मिरालेसने गोल नोंदवला तर मलेशियाच्या फिरहान अशारीचा फटका हुकल्याने स्पेन विजयी झाले.