जेरुसलेम / वृत्तसंस्था
इस्रायलमधील जेरुसलेममधील नेवे याकोव्ह येथील प्रार्थनास्थळाजवळ शनिवार, 28 जानेवारी रोजी अंदाधुंद गोळीबार झाला. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले. पॅलेस्टिनी व्यक्तीने हा हल्ला केला होता. इस्रायल पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी 42 जणांना अटक केली आहे. एका प्रार्थनास्थळाजवळ हा गोळीबार झाला असून पोलिसांनी याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. हल्लेखोर पॅलेस्टिनी असून तो ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, इस्रायलवरील हल्ल्यानंतर गाझा पट्टी, वेस्ट बँक आणि इतर शहरांमध्ये लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
21 वषीय हल्लेखोर अल्कम खैरी याने प्रार्थनास्थळामधून बाहेर पडणाऱया लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करत अवघ्या 15 मिनिटांनी त्याची गाडी रोखली. हल्लेखोराने पोलिसांवरही गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.