शिक्षक संघाच्या पदाधिकाऱयांबरोबर बैठक
प्रतिनिधी/ कराड
महाराष्ट्र राज्य नगरपरिषदा व महानगरपालिका शिक्षक संघाची विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक झाली. शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी व शिष्टमंडळाला दिले.
गेल्या 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य नपा व मनपा शिक्षक संघाच्या झालेल्या एकदिवसीय लक्षवेधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी, उपाध्यक्षा जोत्स्ना भरडा, राज्य महिला आघाडी प्रमुख साधना साळुंखे, कोकण विभागीय अध्यक्ष वैभव पाटील, इतर पदाधिकारी तसेच कराडचे उद्योजक अमित चव्हाण उपस्थित होते.
शंभर टक्के वेतन अनुदान, बदली पोर्टल, इच्छुक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, 10-20-30 आश्वासक वेतन प्रगती योजना, भविष्य निर्वाह भत्त्यातील व्याजातील फरक शासनाचा हिस्सा, नपा, मनपा शिक्षकांना बढती आदी मागण्या शिक्षक संघाने मांडल्या. या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. शिक्षकांच्या मेळाव्यात या मागण्यांबाबत घोषणा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.