पिंपरी / प्रतिनिधी :
विधानपरिषद निवडणुकीची पुनरावृत्ती आघाडी कायम असल्याने आता विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार नानाकाटे यांनी पिंपरी-चिंचवडचे ग्रामदैवत मोरया गोसावीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे चिंचवडचे निरीक्षक आणि पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, चिंचवडचे प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, नरेंद्र बनसोडे, राष्ट्रवादीचे विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदी या वेळी उपस्थित होते.
अधिक वाचा : पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी
पाटील म्हणाले, विधान परिषदेत आघाडीने दणदणीत यश संपादन केले. पाचपैकी फक्त एकच जागा भाजपला मिळाली. आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले, तर भाजपचा पराभव होतो, हे चित्र विधान परिषदेत दिसले. हेच चित्र कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीत दिसेल. चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची सहानुभूती त्यांची पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना मिळणार नाही. भावनिकतेची दखल आता घेतली जात नाही, शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फायदा हा आघाडीलाच होईल, असा दावाही त्यांनी केला.