तीव्रता 4.7 रिश्टर स्केल ः पूर्वीच्या विध्वंसातील मृतांची संख्या 35 हजारपार
अंकारा / वृत्तसंस्था
भीषण विनाशाचा सामना करत असलेल्या तुर्कस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय भागात कहरामनमरासमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून त्याची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. तुर्कीमधील कहरामनमरास शहराच्या दक्षिणेस 24 किलोमीटर अंतरावर रविवारी रात्री उशिरा 4.7 तीव्रतेचा भूकंप झाल्याचे युएस जिओलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) म्हटले आहे. दरम्यान, तुर्कस्तान आणि सीरियामध्ये गेल्या सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 35,000 च्या पुढे गेली आहे.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 6 फेब्रुवारीला 7.8 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला होता. एक-दोन दिवसांनंतरही अनेकवेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तुर्कस्तानच्या दहा प्रांतांमध्ये झालेल्या भूकंपामुळे 25 हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तज्ञांच्या मते, ढिगाऱयात अजूनही 10,000 हून अधिक मृतदेह असू शकतात. तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसह अनेक तज्ञ संस्थांनी मृतांची एकूण संख्या 50 हजारांपेक्षा जास्त असू शकते, असा अंदाज वर्तवला आहे.
हातेय विमानतळ पूर्ववत
दरम्यान, तुर्कस्तानने सर्वाधिक नुकसान झालेल्या हातेय प्रांतातील विमानतळाचे कामकाज पुन्हा सुरू केले आहे. तुर्कीच्या वाहतूक आणि पायाभूत सुविधा मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर छायाचित्रे शेअर करत हातेय विमानतळाच्या धावपट्टीची दुरुस्ती केल्याचे जाहीर केले आहे.
बांधकाम कंत्राटदारांवर कारवाई
निकृष्ट बांधकाम हे भूकंपामुळे मोठय़ा प्रमाणावर झालेल्या विनाशाचे कारण असल्याचा दावा तुर्कस्तानमधील लोकांकडून केला जात आहे. सरकारने वेळीच पावले उचलली असती तर भूकंपामुळे हा प्रकार टाळता आला असता, असेही बोलले जात आहे. तुर्कस्तानमध्ये निकृष्ट इमारती बनवणाऱया 130 हून अधिक कंत्राटदारांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी 131 बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते, त्यापैकी 130 जणांना रविवारी दुपारपर्यंत अटक करण्यात आली आहे. या सर्व कंत्राटदारांवर तुर्कस्तानच्या विविध शहरांमध्ये निकृष्ट इमारती बनवल्याचा आरोप आहे. सोमवारी झालेल्या भूकंपात त्यांनी बांधलेल्या बहुतांश इमारती कोसळल्या, असे तुर्कीचे उपाध्यक्ष फुआत ओक्ते यांनी सांगितले.
इमारत नियमांचे उल्लंघन
तुर्कीमध्ये इमारत बांधकाम संहिता लागू आहे. याअंतर्गत करावयाची बांधकामे, त्याच्या नियमानुसार इमारतींना भूकंपप्रूफ करणे बंधनकारक आहे. परंतु नियमांकडे डोळेझाक करत लाखो इमारती तुर्कीमध्ये बांधल्या गेल्यामुळे त्यांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट झाले आहे. तुर्कीच्या कायदा मंत्रालयाच्या आदेशानुसार सरकारी वकिलांनी इमारतींच्या निकृष्ट बांधकामाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तुर्कीच्या कायदा मंत्र्यांनी या प्रकरणाची फौजदारी चौकशी करण्याचे आदेश दिले. या अंतर्गत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कोडचे उल्लंघन करून निकृष्ट बांधकामासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
राष्ट्राध्यक्षांच्या अडचणी वाढणार
भूकंपामुळे तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप अर्दुआन यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यावषी तुर्कस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकाही होणार आहेत. तुर्कस्तान आधीच उच्च चलनवाढ आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेशी झुंजत आहे. यानंतर आता भूकंपामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. एकंदर अवघड परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने राष्ट्राध्यक्षांसमोरील अडचणी आणखी वाढणार आहेत.
भारतीयाचा मृतदेह आणण्याची तयारी
भूकंपामध्ये प्राण गमावलेल्या भारतीयाचा मृतदेह पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती तुर्कस्तानमधील भारताचे राजदूत वीरेंद्र पॉल यांनी दिली. मृत विजय कुमार हा उत्तराखंडमधील कोटद्वार येथील रहिवासी आहे. कंपनीच्या कामानिमित्त तुर्कस्तान दौऱयावर असताना हॉटेलमधील वास्तव्यावेळी भूकंपात पडझड झाल्याने त्याला प्राण गमवावे लागले होते. दरम्यान, भारताने रविवारी ऑपरेशन दोस्त अंतर्गत मदत सामग्रीने भरलेले सातवे विमान पाठवले. हे विमान सीरियातील दमास्कसला पोहोचले. विमानात 35 टनांहून अधिक मदत सामग्री पाठवण्यात आली. भारताने आतापर्यंत 200 टनांहून अधिक मदत सामग्री आणि 250 हून अधिक बचाव कर्मचारी तुर्की आणि सीरियाला पाठवले आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.