भारतासोबतचे संबंध बिघडण्याची भीती ः 100 वर्षे जुना मुकूट परिधान करणार
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनची नवी राणी म्हणजेच राजे चार्ल्स तृतीय यांची पत्नी कॅमिला या राज्याभिषेकावेळी दिवंगत महाराणी एलिझाबेथ यांचा कोहिनूर जडविण्यात आलेला मुकूट परिधान करणार नाहीत. बंकिंगहॅम पॅलेसने यासंबंधी घोषणा केली आहे. भारतासोबतचे संबंध बिघडू नयेत म्हणून ब्रिटनच्या राजघराण्याने हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानंतर कॅमिला यांच्यासाठी क्वीन मेरी यांचा 100 वर्षे जुना मुकूट तयार करविला जात आहे. कॅमिला यांना राणीचा दर्जा देण्यासाठी 6 मे रोजी क्वीन कंसोर्ट आयोजित होणार असून त्यादरम्यान त्या मुकूट परिधान करणार आहेत. राजघराण्याने क्वीन मेरी यांचा मुकूट कॅमिला यांच्याकरता रिसाइज करविण्यासाठी पाठविला आहे.
राजे जॉर्ज सहावे यांची पत्नी महाराणी एलिझाबेथ यांच्या मुकूटात कोहिनूर जोडण्यात आला होता. तेव्हापासून हा हिरा ब्रिटिश राणीच्या मुकूटात जडलेला आहे. या मुकूटाला ‘द इंपीरियल स्टेट क्राउन’ म्हटले जाते. कॅमिला यांना क्वीन कंसोर्ट या नावाने ओळखले जाईल अशी घोषणा महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी केली होती. 75 वर्षीय कॅमिला या डचेस ऑफ कॉर्नवाल आहेत. तसेच त्या राजे चालर्स यांच्या दुसऱया पत्नी आहेत. राणीचा दर्जा मिळाल्यावरही कॅमिला यांच्याकडे कुठलाच घटनात्मक अधिकार नसेल. परंतु त्यांचे पदे ब्रिटनच्या राणीचे असणार आहे.
कोहिनूर परत करण्याची मागणी
महाराणीच्या मुकूटात जगातील अनेक मूल्यवान हिरे जडलेले असून यात कोहिनूर आणि ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका या हिऱयांचा समावेश आहे. याची किंमत सुमारे 40 कोटी डॉलर्स इतकी असल्याचे मानले जाते. भारताने ब्रिटनसमोर अनेकदा कोहिनूर हिरा परत करण्याची मागणी केली आहे. भारताप्रमाणेच आफ्रिकेने देखील ब्रिटनच्या शाही मुकूटातील मूल्यवान हिरा परत करण्याची मागणी केली आहे.