वार्ताहर /घटप्रभा
गोकाक येथील व्यावसायिक राजेश झंवर यांच्या खून प्रकरणातील डॉ. सचिन शिरगावीसह दोन आरोपींना अटक केल्यानंतर इतर फरारी दोन आरोपींना सोमवारी सायंकाळी अटक करण्यात गोकाक शहर पोलीस पथक यशस्वी ठरले आहे. गोकाकमधील योगीकोळ भागात फिरणाऱ्या या दोघांना पोलिसांनी अटक केली. गोकाक येथील मोमीन गल्लीतील वेल्डींग कामगार मोहिन पटेल (वय 24) व लगड गल्लीतील टाईल्स कामगार अब्दुल मोहमद हनीफ मुल्ला (वय 21) हे दोघेही यापूर्वी अटक झालेल्या शाफत त्रासगार याचे मित्र आहेत. व्यावसायिक राजेश झंवर यांचा अपहरण करून खुनाच्या क्रूर घटनेतील दोन डॉक्टर व तीन आरोपी असे 5 जणांनी खून करून राजेश झंवरचा मृतदेह घटप्रभा नदीच्या उजव्या कालव्यात टाकल्याचे कबूल केले. तरी रमेश झंवर याचा मृतदेह शोधकाम पोलिसांना कठीण झाले होते. कारण मृतदेह प्रमुख पोटकालव्यातून 8 किमी दूर जाऊन एका पाईपमध्ये अडकला होता. अखेर सातव्या दिवशी पोलिसांना मृतदेह शोधण्यात यश आले. या घटनेतील प्रमुख आरोपी डॉ. सचिन शिरगावीसह इतर चारजणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.