@ वृत्तसंस्था/ जकार्ता
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी इंधन साठवणूक तेल डेपोला लागलेल्या भीषण आगीत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकर्ते आणि अग्निशमन दलाने शनिवारी मदत आणि शोधकार्य सुरू ठेवले. परंतु 16 लोक अद्याप बेपत्ता आहेत. बचावकर्ते बेपत्ता असलेल्या 16 लोकांचा शोध घेत आहेत आणि सुमारे 49 लोकांवर पाच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.
डेपोला लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाल्यची घोषणा शनिवारी करण्यात आली. उत्तर जकार्तामध्ये दाट लोकवस्तीच्या जवळ राज्य तेल आणि वायू कंपनीद्वारे संचालित तेलडेपोमध्ये आगीची दुर्घटना घडली आहे. या डेपोमधून इंडोनेशियाच्या 25 टक्के इंधनाच्या गरजा पुरवल्या जातात. तेलडेपोच्या परिसरात किमान 260 अग्निशमन दल आणि 52 फायर इंजिन आग विझवण्यात गुंतले आहेत. प्राथमिक तपासात पाईपलाईन फुटल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात आले.