नगरसेवकांच्या तक्रारींची घेतली दखल : अर्थसंकल्प बैठकीची तारीख निश्चित : 13 रोजी बैठकीचे आयोजन
बेळगाव : अर्थसंकल्प तयारीसाठी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. ही औपचारिकता पूर्ण करताच अर्थसंकल्प बैठकीसाठी महापालिकेने नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत. सोमवार दि. 13 रोजी सकाळी 10.30 वा. अर्थसंकल्पीय बैठक आयोजित केली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यासह मंजुरी देण्यासाठी ही बैठक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अर्थसंकल्प बैठक असल्याचे सांगून सोमवारी महापालिकेत बैठक आयोजित केली होती. मात्र नोटीस नसताना अचानकपणे बैठक आयोजित केल्याने याबाबत आक्षेप घेण्यात आला होता. बैठकीबाबत केवळ व्हॉट्सअॅप व मोबाईलवर संपर्क साधून बैठक असल्याचे नगरसेवकांना सांगण्यात आले होते. कोणत्या विषयावर चर्चा होणार याची कोणतीच कल्पना नगरसेवकांना नव्हती. ही अर्थसंकल्प बैठक असल्याचे कौन्सिल विभागातून सांगण्यात आले होते. मात्र अर्थसंकल्प बैठक नसून अर्थसंकल्प तयार करण्याकरिता सूचना घेण्यासाठी बैठक आयोजित केली असल्याचे स्पष्टीकरण महापौरांनी दिले होते. पण कोणतीही बैठक घेण्यापूर्वी सात दिवसांआधी नोटीस बजावणे आवश्यक असल्याचे सांगून नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. तसेच नियमानुसार कोणतीही बैठक घेण्यापूर्वी सात दिवस आधी नोटीस देण्यात यावी, अशा सूचना नगरसेवकांनी केल्या होत्या.
नगरसेवकांच्या आक्षेपाची दखल
नगरसेवकांच्या आक्षेपाची दखल घेत महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्प बैठकीची नोटीस सात दिवस आधी पाठविली आहे. सोमवारी सकाळी बैठक झाल्यानंतर दि. 13 रोजीच्या बैठकीची तयारी लागलीच सायंकाळी करण्यात आली व दि. 6 रोजीची तारीख नमूद करून नगरसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र या नोटिसा दि. 8 रोजी नगरसेवकांना पोहोचल्या आहेत. अखेर नगरसेवकांच्या तक्रारीची दखल घेऊन बैठकीची नोटीस आधी पाठविण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सूचना घेण्याची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर लागलीच अर्थसंकल्प बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे