पाकिस्तानसाठी गूड न्यूज : अफगाणिस्तानात नेतृत्वबदल घडवून आणण्याच्या हालचाली
वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा अमेरिकेच्या कारवाईची शक्यता वाढली आहे. अमेरिका आणि त्याच्या पाश्चिमात्य सहकारी देशांनी अफगाणिस्तानसंबंधी एक गोपनीय बैठक घेतली आहे. यात पाकिस्तान सैन्यासाठी काळ ठरलेल्या तहरीक-ए-तालिबान दहशतवाद्यांना अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसाठीही मोठा धोका मानले गेले आहे. अफगाणिस्तानविषयक स्थापन गटाने पॅरिसमध्ये ही बैठक घेतली आहे. यात तालिबानविरोधात भूमिका घेत पाकिस्तानचे समर्थन करण्यात आले आहे. अमेरिका तालिबानमधील कथित उदारमतवादी गटाला बळ पुरवू शकतो असे मानले जात आहे. पॅरिसमध्ये झालेल्या या बैठकीत ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोपीय महासंघ, फ्रान्स, जर्मनी, इटली, नॉर्वे, स्वीत्झर्लंड, ब्रिटनच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता. यात अफगाणिस्तानच्या बिघडत्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीबद्दल प्रारंभी कुठलीच माहिती समोर येऊ दिली गेली नाही. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने चालू आठवडय़ात यासंबंधी वक्तव्य केले आहे.
अमेरिकेचा तालिबानला इशारा
ही गोपनीय बैठक युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आली होती. युक्रेन युद्धादरम्यानही अमेरिकेचे अफगाणिस्तानवरील लक्ष कायम असल्याचे या बैठकीमुळे स्पष्ट झाले आहे. टीटीपी, आयएसकेपी यासारख्या दहशतवादी संघटना अफगाणिस्तान, आशिया आणि जगाच्या सुरक्षा तसेच स्थैर्याला मोठय़ा प्रमाणात प्रभावित करत असल्याचे अमेरिकेने म्टटले आहे. या दहशतवादी संघटनांना आश्रय पुरवू नका असे या बैठकीद्वारे तालिबानच्या राजवटीला सांगण्यात आले आहे. पाश्चिमात्य देशांनी टीटीपीला स्वतःच्या सुरक्षेसाठी धोकादायक मानण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानसाठी एकप्रकारे ही गूड न्यूजच आहे. पाकिस्तान सातत्याने टीटीपीच्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी तालिबानवर दबाव टाकत आहे. तर तालिबानकडून टीटीपीच्या अस्तित्वाचे दावे नाकारण्यात येत आहे. टीटीपीने अलिकडेच पेशावरमध्ये मशिदीत आत्मघाती स्फोट घडवून आणत 100 हून अधिक पोलिसांचा जीव घेतला होता.
तालिबानची राजवट उलथविणार?
अफगाणिस्तनाच्या स्थितीवरून पाश्चिमात्य देश चिंतेत असल्याचे संकेत यातून मिळाले आहेत. अल-कायदाकडून 9/11 चा हल्ला करण्यात आल्यावर पाश्चिमात्य देशांचा गट स्थापन करण्यात आला होता. तालिबानने ठोस पावले न उचलल्यास अमेरिका पुन्हा एकदा अफगाणिस्तानात कारवाई करू शकतो आणि पाकिस्तान याप्रकरणी अमेरिकेला मदत करणार असल्याचे मानले जात आहे. तालिबानमधील अंतर्गत कलह आता वाढला आहे. अशा स्थितीत अमेरिका पाकिस्तानच्या मदतीने तालिबानच्या नेतृत्वात बदल घडवून आणू शकतो. तालिबानमधील कथित उदारमतवादी आणि कट्टरवादी गटांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अमेरिका उदारमतवादी गटाला बळ पुरवू पाहत आहे. या नव्या घडामोडींचा पाकिस्तानवर मोठा प्रभाव पडणार आहे.