वाहतूक व कत्तलप्रकरणी दोघांना अटक ; 9 जीवंत, 4 मृत,4 कापलेल्या डुक्करांचे मांस जत्प,‘आरडीएम’ च्या नावाखाली पाळीव डुक्कर खपविणारी टोळी
धारबांदोडा : पेटके-धारबांदोडा येथील एका खासगी जागेत उघड्यावर खुलेआम डुक्करांची कत्तल करण्याचा प्रकार उघडकीस आला असून वन खात्याने दोन संशयिताना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत हुबळी येथून सुमारे 17 डुक्कर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता मोलेमार्गे आणल्याची कबूली संशयित आरोपींनी दिली आहे. त्यामुळे मोले चेकनाके सध्या संशयाच्या घेऱ्यात आले आहे. सदर टोळीतर्फे फोंडा व धारबांदोडा भागात ‘आरडीएम’ च्या नावाखाली पाळीव डुक्कराच्या मांसाची बेसुमार विक्री होत असल्याचा संशयही लोकांनी व्यक्त केला आहे. कुळे क्षेत्रीय विभागाचे वनपाल नारायण प्रभूदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार बसव्वा रमेश दो•ामणी (66) मूळ नवनगर धारवाड येथील तर सध्या उसगांव तीस्क येथे वास्तव्यास असलेला व मंजुनाथ दोड्ढामणी (37) राहणारा धारवाड यांना ताब्यात घेऊन सहाय्यक वनसंरक्षक विश्वास चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू असल्याचे सांगून एकूण 17 डुक्कर आणण्dयात आले होते. पैकी 9 जीवंत तर 4 मृत तसेच 4 कापलेल्या डुक्कराचे मांस ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मोले येथील पशुसंवर्धन खात्याचे डॉ. केतन चौगुले यांनी डुक्करांची तपासणी केली व डुक्कराचे अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. पिळ्यो प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. संदेश मडकईकर हेही यावेळी उपस्थित होते.
डुक्कर पाळीव की रानटी? आरडीएमच्या नावाखाली पाळीव डुक्करांची सर्रास विक्री?
सदर डुक्कर पाळीव की रानटी हे अहवाल आल्यानतंरच सिद्ध होणार आहे. मात्र जे चार डुक्कर कापण्यात आली होते त्यांचे वाटे प्लास्टिकच्या पिशव्या घालण्यात आले होते, यावरून हे मांस रानटी डुक्कराचे असल्याचे भासवून लोकांना सर्रासपणे विकले जात नाही ना, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झाला असून त्याबद्दल सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. घटनास्थळी वजनकाटाही आढळला असून ठराविक वजनाच्या पिशव्या भरून आरडीएमच्या नावाने विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याचा संशय येथील स्थानिकांनी केली आहे. वास्तविक कोणतेही जनावर राज्यात आणत असताना अनेक सोपस्कर पुर्ण करावे लागत आहे. शिवाय अनेक नियमांचे पालनही करावे लागतात आहे. याची तपासणी चेक नाक्यावर करण्यात आली होती का असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान धारबांदोड्याचे सरपंच विनायक गावस, पंचसदस्य कवित गावकर, महेशन नाईक यांनी याप्रकरणी संबंधित खात्याने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली असून असे प्रकार धारबांदोडा पंचायत क्षेत्रात कदापी खपवून घेतले जाणार नाही असा ईशारा दिला आहे.