ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बिडकर यांना देण्यात आलेल्या धमक्यांचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील आणखी एका नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्याकडे 30 लाखांची खंडणी मागत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी बागवे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश बागवे यांना मंगळवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास एका अज्ञात क्रमांकावरुन व्हॉट्सऍप कॉल आला. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने “30 लाख रुपये दे, नाहीतर तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद करू, दोन दिवसांत पैसे नाही मिळाले तर तुला गोळ्या घालू”, अशी धमकी दिली. त्यानंतर याच क्रमांकावरून एक मेसेज आला. त्यामध्ये आम्ही ‘सात-आठ जण आहोत. पोलिसांनी आमच्यामधील दोघांना जरी आत टाकलं तरी आम्ही तुझ्या घरच्या आणि ऑफिसच्या बाहेर असतो,’असे म्हटले होते.
या प्रकारानंतर अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बागवेंच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून, तपासाला सुरूवात केली आहे.
अधिक वाचा : आरटीईसाठी आज ऑनलाईन सोडत