दुलीप ट्रॉफी 28 जूनपासून तर रणजी स्पर्धा 5 जानेवारीपासून सुरु होणार, वरिष्ठ महिलांच्या स्पर्धा ऑक्टोबरपासून
वृत्तसंस्था/ मुंबई
यंदाच्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामाचा शुभारंभ 28 जूनपासून सुरु होणाऱ्या दुलीप ट्रॉफीपासून होणार आहे. स्थानिक हंगामातील प्रमुख अशी रणजी स्पर्धा पुढील वर्षी 5 जानेवारी ते 14 मार्च दरम्यान खेळवली जाणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली. यादरम्यान सहा प्रादेशिक संघादरम्यान दुलीप ट्रॉफी खेळवली जाईल. याशिवाय, देवधर चषक, इराणी करंडक, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या तारखाही यावेळी जाहीर करण्यात आल्या आहेत.
रणजी करंडक ही या मोसमातील पुरुष वरिष्ठ गटातील शेवटची स्पर्धा असेल. त्याच्या एलिट गटातील साखळी टप्प्यातील सामने 5 जानेवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान खेळवले जातील तर बाद फेरीचे सामने 23 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान होतील. ही स्पर्धा 70 दिवस चालणार आहे. प्लेट गटाचे साखळी सामने 5 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान तर बाद फेरीचे सामने 9 ते 22 फेब्रुवारी दरम्यान खेळवले जातील. एलिट गटात, चार गटांमध्ये आठ संघ असतील, त्यापैकी प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. प्लेट गटातील सहा पैकी अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. प्लेट ग्रुपच्या अंतिम फेरीत पोहोचणारे दोन्ही संघ आगामी हंगामात (2024-25) एलिट गटात सामील होतील.
दरम्यान, बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीनंतर देवधर चषक, इराणी करंडक, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली चषक व रणजी चषक स्पर्धेच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.
महिलांचा हंगाम ऑक्टोबरपासून
यंदा महिलांच्या देशांतर्गत हंगामाची सुरुवात ऑक्टोबरपासून होणार आहे. राष्ट्रीय टी-20 चॅम्पियनशिप स्पर्धा 19 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. यानंतर इंटर झोनल टी-20 स्पर्धा 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान होणार आहे. या स्पर्धेनंतर पुढील वर्षी 4 ते 26 जानेवारी या कालावधीत महिला वनडे चषक आयोजित करण्यात आला आहे.
देशातंर्गत स्पर्धेचे वेळापत्रक (2023-24)
स्पर्धा तारीख
दुलीप करंडक 28 जून ते 16 जुलै
देवधर करंडक 24 जुलै ते 3 ऑगस्ट
इराणी चषक 1 ते 5 ऑक्टोबर
सय्यद मुश्ताक अली 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर
विजय हजारे करंडक 13 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर
रणजी करंडक 5 जानेवारी 2024 ते 14 मार्च.