राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची राज्यात पत घसरली असून लोकांचं लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य चंद्रकांत पाटील करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. चंद्रकांत पाटीलांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी समस्त हिंदू समाजाची माफी मागून राजीनामा द्यावा अशी टिका कोल्हापूरात शिवसैनिकांनी केली. आज कोल्हापूरात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात निदर्शने शिवसैनिकांनी केली त्यावेळी ते बोलत होते.
काही दिवसापुर्वी राज्याचे मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यामागे बाळासाहेब ठाकरे यांचा काही संबंध नव्हता असे म्हटले होते. त्यानंतर वादाला सुरवात होऊन राज्यभारत शिवसैनिकांकडून यांचा निषेध करण्यात आला. कोल्हापूरातही जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली.
यावेळी बोलताना विजय देवणे म्हणाले, “बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडल्याचा अभिमान असल्याचे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील कोणत्या बिळात लपून बसले होते ? चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे देखील सहमत नाहीत. बाळासाहेबांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी समस्त हिंदू समाजाची माफी मागावी आणि राजीनामा द्यावा.” असे ते म्हणाले.