पुणे / वार्ताहर :
पुण्यातील प्रसिद्ध चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स दुकानातील 1 किलो 246 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून 79 लाख 38 हजार 420 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महिला कर्मचाऱ्यासह अन्य एकाला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
कोमल अनिल केदारी (वय 24, रा. नानापेठ, पुणे) आणि सागर सुर्यकांत नकाते (वय 32, रा. ससाणेनगर, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघां आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि कोमल हे चंदुकाका सराफी दुकानात आवक-जावक विभागात नोकरीस होते. त्यांनी दुकानात नोकरी करताना संगनमत करून पैशाच्या हव्यासापोटी दुकानातील एक-एक दागिना गायब करत आत्तापर्यंत तब्बल 36 दागिने लंपास केले. मात्र, दुकानाच्या ऑडीटमध्ये संबधित दागिने प्रवासात असल्याचे ते भासवत होते. मात्र, नुकतेच दुकानातील दागिन्यांची तपासणी करताना एक दागिना नसल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर व्यवस्थापनाने सर्व दागिन्यांची तपासणी केली असता, एकूण 36 दागिने लंपास झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दुकानात सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी सागर आणि कोमल हे दोघे गडबडले. त्यामुळे याबाबत दुकानाचे व्यवस्थापक ओंकार प्रताप तिवारी (29, रा. वृंदावन सोसायटी, चऱ्होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता पैशासाठी हा गुन्हा केल्याचे त्यांनी कबुल केले. त्यांनी तब्बल 1 किलो 246 ग्रॅम दागिन्यांचा अपहार करत वेगवेगळय़ा फायनान्स कंपन्यांकडून त्यांनी कर्ज काढल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर दोघांना अटक करण्यात आली. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते 26 एप्रिल 2023 दरम्यान घडला आहे.