बुद्धिबळातील आयकॉन खेळाडूंचा सहभाग, दुबईत होणार पहिली स्पर्धा
वृत्तसंस्था/ दुबई
बुद्धिबळामध्ये आता ग्लोबल चेस लीगचे (जीसीएल) आयोजन होणार असून त्यात बुद्धिबळातील आयकॉन खेळाडू विश्वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसन, होयू यिफान, डिंग लिरेन यासारख्या खेळाडूंचा सहभाग असणार आहे.
जीसीएलचे आयोजन टेक महिंद्रा व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशन फिडे यांनी संयुक्तपणे केले आहे. यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. जीसीएलचा पहिला मोसम दुबई चेस अँड कल्चरल क्लब येथे 21 जून ते 2 जुलै या कालावधीत दुबई स्पोर्ट्स कौन्सिल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येईल.
डिंग लिरेन हा विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन असून कार्लसन हा जागतिक अग्रमानांकित खेळाडू आहे. आनंद पाचवेळचा वर्ल्ड चॅम्पियन असून यिफान चार वेळची महिला वर्ल्ड चॅम्पियन आहे. यातील सर्व संघ संयुक्त टीम फॉरमॅटमध्ये खेळतील. प्रत्येक संघात 6 खेळाडू असतील, त्यापैकी दोन महिला असणे आवश्यक आहे. चुरस वाढविण्यासाठी आणखी पाच वर्ल्ड चॅम्पियन्सही त्यात भाग घेणार असून त्यात लिरेन, 2021 वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन नॉदिरबेक अब्दुसत्तोरोव्हृ 2008 ब्लिट्झ वर्ल्ड चॅम्पियन लिनीअर डॉमिनिगेझ, तीन वेळचा ब्लिट्झ चॅम्पियन अॅलेक्झांडर ग्रिस्चुक व 2018 चा वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन डॅनील डुबोव्ह यांचा समावेश आहे.