प्रतिनिधी, कोल्हापूर
Senior labor leader Govind Pansare murder case : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे खून खटल्याची सुनावणी (दि. 20) जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) एस. एस. तांबे यांच्यासमोर मंगळवारी पार पडली. पंच साक्षीदार नितीन मंगेश जाधव (वय 35, रा. शास्त्रीनगर, कोल्हापूर) यांनी संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (रा. सांगली) याला ओळखले. गायकवाड याच्या अटकेदरम्यान जप्त केलेले त्याचे दोन मोबाइलही पंच साक्षीदार नितीन मंगेश जाधव यांनी ओळखले. पुढील सुनावणी तीन जुलैला होणार आहे.
पानसरे खून खटल्यातील संशयिताच्या अटकेचा पंच साक्षीदार नितीन जाधव यांची साक्ष मंगळवारी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायाधीशांसमोर नोंदवली. यावेळी साक्षीदार जाधव याने न्यायालयात उपस्थित असलेल्या संशयीत आरोपी समीर गायकवाड यास ओळखले. गायकवाड याच्या जवळ जाऊन, तेव्हाचा अटकेतील संशयित हाच असल्याचे न्यायाधीशांना सांगितले. यानंतर जाधव यांनी आरोपी समीर गायकवाड याच्या अटकेच्या पंचनाम्याचा घटनाक्रम सांगितला. अटकेनंतर माझ्या समोर संशयिताच्या पँटच्या खिशातून दोन मोबाइल जप्त केले, तसेच त्याच्या अंगावरील खुणा तपासून पोलिसांनी अटकेचा पंचनामा केला,‘ अशी साक्ष जाधव यांनी दिली. तसेच समीरकडून जप्त केलेल्या दोन मोबाईलमध्ये 57 नंबर असल्याची साक्षही त्यांनी दिली.
संशयित आरोपींच्या वतीने अॅड. विरेंद्र इचलकरंजीकर, अॅड. समीर पटवर्धन, आणि अॅड. डी. एम. लटके, अॅड. ए. एस. रुईकर, अॅड. प्रवीण करोशी यांनी साक्षीदाराची उलट तपासणी घेतली. पोलिसांनी समीरच्या मोबाइलचा लॉक उघडला नाही. मोबाइल खोलून त्याचा आयएमईआय नंबरही पाहिला नाही. त्याचे घड्याळ, पाकिट, बेल्ट जप्तीची नोंद पंचनाम्यात केली नाही, असे मुद्दे संशयितांच्या वकिलांनी मांडले. तसेच साक्षीदार मुद्दाम काही प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आक्षेप अॅड. इचलकरंजीकर यांनी नोंदवला.
मोबाईलचा घोळ
अटक पंचनाम्यावेळी जप्त केलेले मोबाइल ओळखण्यासाठी न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आला. सुरुवातीला वेगळाच बॉक्स उघडण्यात आला. यामध्ये पहिल्या पाकिटात गोविंद पानसरे यांचा मोबाईल मिळाला. प्रत्यक्षात संशयीत समीर गायकवाड याचे दोन मोबाईल मिळणे अपेक्षीत होते. यामुळे सुनावणीस अर्धा तासाचा वेळ गेला.
शेंडगे,एस.ए.गुरव,आर.डी.जाधव,के.पी.पाटील,जे.एल.लवटे,पी.ए.शिंदे,संभाजी गोसावी, सुमन गिरी उपस्थीत होते.