NCB चे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर गंभिर आरोप केले आहेत. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आपल्याला ज्ञानेश्वर सिंग यांनी बळीचा बकरा बनवल्याचा आरोप केला असून त्यांनी आपल्याविरुद्ध सूड उगवला असल्याचा खुलासाही त्यांनी केला.
वानखेडे यांनी त्यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध सीबीआय ने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर एनसीबीने प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्राला उत्तर म्हणून समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर केले. कॉर्डेलिया प्रकरणात आपल्या मुलाला गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये उकळण्याचा कट रचल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
वानखेडे यांनी उच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, सध्या सीबीआयच्या ताब्यात असलेल्या तीन ऑडिओ क्लिप सादर केल्या. ज्यामध्ये ज्ञानेश्वर सिंग यांनी या प्रकरणातील साक्षीदारांचा छळ कशा प्रकारे केला गेला याचा खुलासा या साक्षीदारांपैकी एक असलेल्या विरल राजन याने केला आहे. वानखेडे यांनी असाही आरोप केला आहे की, ज्ञानेश्वर सिंगने त्याचा कौटुंबिक मित्र, विरल राजन याला आणि त्याच्या कुटुंबियांना धमकावले. विरल राजन याच्यावर क्रांती वानखेडे यांना महागडी घड्याळे गिफ्ट केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.