राजापूर ,प्रतिनिधी
Rajapur : राजापूर तालुक्यातील नाणार शिंदेवाडी येथे भक्ष्यचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने वाचवले.हि घटना (दि-12 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7:30 च्या सुमारास घडली. नाणार पैकी शिंदेवाडी,ता. राजापूर येथील श्री कृष्णा शंकर पातले यांच्या घराच्या विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याचे खबर ग्रामपंचायत सदस्य ओंकार रामकृष्ण पेडणेकर यांनी वनपाल राजापूर सदानंद घाटगे यांना सांगितले. त्यानंतर वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांना भ्रमणध्वनीवरून वनपाल यांनी माहिती दिली.त्यानंतर वनविभागाची टीम जागेवर पोहचली विहीरीची पाहणी केली.
जवळपास तीस फुट खोल विहिरीत बिबट्या पडलेला आढळून आला.या विहीरीचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो.बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यासाठी सकाळी ९.३० वा. पिंजरा विहिरीत सोडण्यात आला.जवळपास पाऊण तासानंतर 10:15 वाजण्याच्या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षित आला.हा बिबट्या मादी असून साधारण दिड वर्षाचा आहे.
बिबट्याची पशुसंवर्धन अधिकारी राजापूर यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण)दीपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.या रेस्कु ऑपरेशनमध्ये प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी ,सदानंद घाटगे वनपाल राजापूर , विक्रम कुंभार वनरक्षक राजापूर ,रेस्कु टीम राजापूर चे दीपक म्हादये ,विजय म्हादये ,नितेश गुरव,प्रथमेश म्हादये ,निलेश म्हादये ,राजू दिवटे,ओंकार पेडणेकर व स्थानिक ग्रामस्थांनी भाग घेतला.