मान्यवरांच्या हस्ते चालना : प्राणी प्रेमींचा होणार गौरव
बेळगाव : रेबीजचे प्रमाण शून्य करण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत आजपासून जिल्ह्यात रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. मांजर आणि श्वान पालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन लस टोचून घ्यावी, असे आवाहन खात्याने केले आहे. त्याबरोबर सन्मान हॉटेल समोरील मुख्य पशुवैद्यकीय दवाखान्यात शनिवार दि. 30 रोजी रेबीज प्रतिबंधक मोहिमेला चालना दिली जाणार आहे. यावेळी आमदार राजू सेट, नगरसेवक शंकर पाटील, राजेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत.
शहरातील पेट शॉपना मिळणार नोंदणी प्रमाणपत्र शहरात 25 हून अधिक
पेटशॉप आहेत. या पेटशॉप दुकानदारांना पशुसंगोपनमार्फत शनिवारी नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पेटशॉप कायद्यानुसार प्राण्यांची विक्री करताना नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. यासाठी खात्याने हा निर्णय घेतला आहे. शहरात भटकी कुत्री, मांजरे, पक्षी व प्राण्यांना संकटकाळात मदत करून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या प्राणी प्रेमींचा गौरव प्रमाणपत्र देवून करण्यात येणार आहे. शहरात अलिकडे प्राणी प्रेमींची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्राण्यांची अडीअडचणींच्या काळात सेवा होवू लागली आहे. प्राणी प्रेमींच्या कार्याचा गौरव म्हणून गौरव प्रमाणपत्र देवून सन्मान केला जाणार आहे.
पाळीसह भटक्या कुत्र्यांनाही लस
शहरात कुत्र्यांकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. मागील दोन महिन्यात 5 ते 6 वेळा बालकांवर कुत्र्यांचे हल्ले झाले आहेत. त्यामुळे रेबीजचा धोका समोर येवू लागला आहे. यासाठी जिल्ह्यात 30 सप्टेंबरपासून महिनाभर मोफत रेबीज प्रतिबंधक मोहीम राबविली जाणार आहे. मांजर, कुत्रा आणि इतर प्राण्यांना ही लस टोचली जाणार आहे. जिल्ह्यात पाळीव श्वानांची संख्याही 9 हजारांहून अधिक आहे. पाळीव श्वानांबरोबर भटक्या कुत्र्यांनाही ही लस दिली जाणार आहे.
रेबीज टाळण्यासाठी श्वान पालकांनी लस घेणे आवश्यक
शाळा आणि महाविद्यालय स्तरावर रेबीजबाबत जागृती केली जात आहे. सर्व मांजर, कुत्रे आणि इतर प्राण्यांना रेबीज लस टोचण्यासाठी खात्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत. गावोगावी जागृती केली जात आहे. रेबीज टाळण्यासाठी श्वान पालकांनी लस घेणे आवश्यक आहे.