सांगली / प्रतिनिधी
सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेतील युवकांच्या टोळक्याने बुधवारी मध्यरात्री धुडगूस घातला. एक चारचाकी पेटवून दिली. तर अन्य दहा वाहनांची प्रचंड तोडफोड केली. यामध्ये सर्व वाहनाचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या प्रकरणी दोन युवकांना अटक करण्यात आली आहे. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अन्य युवकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी दिली.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान युवकांनी दारूच्या नशेत जाळपोळ व तोडफोडीचे कृत्य केले आहे. अतुल अनिल गुरव व सैफ मेहबूब पटेल (दोघे रा. १०० फुटी रस्ता, सांगली) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान या घटनेत कोणत्याही पक्ष, संघटनेचा संबंध नाही. कोणत्याही अफवांवर सांगलीकरांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी केले आहे. तसेच अफवा पसरविण्या र्या वर कडक कायदेशीर कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.