पुणे / प्रतिनिधी :
सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना चित्रपट्यांच्या गाण्यावर थिरकणारी आणि मद्यधुंद झालेले तरुण-तरुणी दिसतात. परंतु व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरीता वर्षाअखेरीच्या मधूर संध्येला संकल्प करु, दारु सोडून दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करु… असे म्हणत महाविद्यालयीन तरुणाई आणि पोलिसांनी पुढाकार घेतला. दारु सोडा, दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत पोलिसांनी देखील दूध वाटप केले.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, लायन्स क्लब आॅफ पुणे पर्ल यांच्या संयुक्त विद्यमाने दारु सोडा, दूध प्या अभियान राबविण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग, हेमंत दांगट, रामकिशन कलवले, लायन्स क्लबचे सुनील चड््डा, माणिक निवंगुणे, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. वर्षाअखेरीच्या मधूर संध्येला व्यसनमुक्तीचा संकल्प करण्याकरीता मोठया संख्येने तरुणांनी अभियानात सहभाग घेतला.
प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात. मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालविल्यामुळे अनेक अपघात देखील होतात. नव्यावर्षाच्या सुरूवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध घ्या हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजे.