ऑनलाइन टीम / पुणे :
राजा परांजपे प्रोडक्शनच्या वतीने पाचव्या ‘राजा परांजपे करंडक दीर्घांक स्पर्धे’च्या अंतिम फेरीचे आयोजन १५ ते १८ जानेवारी २०२० रोजी भरत नाट्य मंदीर येथे रात्री ९ ते १२ यावेळेत व १९ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत करण्यात आले असून, १९ जानेवारी रोजी सायं ५ वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात येणार असल्याची माहिती राजा परांजपे प्रोडक्शनच्या संचालिका अर्चना राणे यांनी दिली.
तत्पूर्वी पुणे व मुंबई येथे घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरीतून १० बाय १० (आकांक्षा रंगभूमी, पुणे), द कट (वलय नाट्यसंस्था, पुणे), सांज (थिएटर दिलसे, पुणे), एक्सटसी (आकांक्षा रंगभूमी, पुणे), घटोत्कच (अभिनय, कल्याण), चित्तरकथा (अकादमी ऑफ थिएटर आदर्श), गुगलीफाय (मनश्री आर्ट्स, मुंबई), भा. वि. अमृत (नाट्यकर्मी, पुणे), फडस (रंग पंढरी, पुणे) व नॉट अ स्ट्रेट थिंग (ईमॅजीन आर्ट्स, पुणे) या दहा दीर्घांकांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण अर्चना राणे व सुबोध राजगुरू यांनी केले होते.
स्पर्धेचा बक्षीस वितरण प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी राजा परांजपे प्रोडक्शनच्या संचालिका अर्चना राणे, संचालक अजय राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गतवर्षी रंगपंढरी संघाच्या ‘निरुपण’ या दीर्घांकाने विजेतेपदाला गवसणी घातली होती. तर द्वितीय पारितोषिक ‘रेनबोवाला’ (गंधर्वकला धारा) तर तृतीय पारितोषिक ‘विपाशा’ (चक्री, पुणे) संघाने मिळविले होते.