शोपियांमध्ये चकमक : दक्षिण काश्मीरमधील हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचे उच्चाटन दृष्टीपथात : सुरक्षा दलांना मिळतेय यश
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या शोपियां येथे सोमवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिदीनच्या 3 दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले आहे. शोपियांमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुलचा कमांडर वसीम अहमद वाणीचा समावेश असून तो 2017 पासून काश्मीर खोऱयातील कारवायांमध्ये सामील होता. हिजबुल मुजाहिदीनच्या या दहशतवाद्यावर चार नागरिक तसेच 4 पोलिसांच्या हत्येचा आरोप होता. त्याच्या विरोधात 19 गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे.
तर अन्य मृत दहशतवाद्याचे नाव आदिल शेख असून तिसऱयाची ओळख अद्याप पटलेली नाही. दक्षिण काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या खात्म्याच्या अत्यंत नजीक पोहोचलो आहोत असे उद्गार पोलीस महासंचालकांनी काढले आहेत. मागील आठवडय़ात जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्हय़ात सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिदीनच्या हारुन हफज या कमांडरला यमसदनी पाठविले होते.
देविंदर प्रकरण एनआयएकडे
निलंबित पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंगचे प्रकरण एनआयएला सोपविण्यात आले आहे. अशा स्थितीत याप्रकरणी टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. त्याच्या चौकशीतून समोर आलेल्या बाबी एनआयएसमोर मांडण्यात आल्या आहेत. देविंदर सध्या एनआयएच्या कोठडीत असून योग्य दिशेने तपास सुरू आहे. देविंदरची मुलगी बांगलादेशात शिकत असल्यानेच त्याने तेथील दौरा केला असण्याची शक्यता आहे. देविंदरच्या बांगलादेश दौऱयासंबंधी तपास सुरू असल्याचे सिंग यांनी सांगितले आहे. देविंदरने 2019 मध्ये बांगलादेशचे तीन दौरे केले होते.
दहशतवादविरोधी मोहीम
मागील 15 दिवसांमध्ये सुरक्षा दलांच्या धडक कारवाईत 5 दहशतवादी मारले गेले आहेत. मागील आठवडय़ात त्रालच्या गुलशनपोरा येथील चकमकीत हिजबुल तसेच जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास यश आले होते. दहशतवादी उमर फैयाज लोण आणि आदिल बशीर मीर हे हिजबुल मुजाहिदीनचे तर जैश-ए-मोहम्मदशी संबंधित फैजान अहमद भट्ट हा या चकमकींमध्ये मारला गेला होता.
कट्टरतावादापासून मुक्ती
काश्मीरमध्ये कट्टरतावादापासून मुक्ती मिळवून देणाऱया शिबिरांची गरज आहे का, असा प्रश्न पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांना विचारण्यात आला होता. काश्मीरमध्ये अशा शिबिरांची निर्मिती झाल्यास तो चांगला संकेत ठरणार आहे, या प्रकारच्या शिबिरांची आवश्यकता आहे. नागरी संस्थेचे सदस्य, धर्म तसेच अन्य बाबींचे तज्ञ सामील असलेली उत्तम व्यवस्था केली जाणे लाभदायक ठरणार असून त्याचे स्वागतच केले जावे असे पोलीस महासंचालकांनी म्हटले
आहे.
पुलवामामध्ये ग्रेनेड हल्ला
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका तळावर ग्रेनेडने हल्ला केला आहे. हा हल्ला पुलवामाच्या नेवा गावात झाला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.