ऑस्ट्रेलिया ओपन : वोझ्नियाकी, सित्सिपस, कोको गॉफ, सोराना यांचेही विजय
वृत्तसंस्था/ मेलबर्न
द्वितीय मानांकित सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, जपानची नाओमी ओसाका, अमेरिकेची सेरेना विल्यम्स, जागतिक सहावा मानांकित स्टीफानोस सित्सिपस, ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टी आणि शेवटची स्पर्धा खेळणारी डेन्मार्कची कॅरोलिन वोझ्नियाकी यांनी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. कॅनडाच्या डेनिस शॅपोव्हॅलोव्हला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्याचप्रमाणे अनुभवी व्हीनस विल्यम्स, बार्बोरा स्ट्रायकोव्हा यांचे आव्हानही संपुष्टात आले.
जोकोविचला पहिल्याच फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याला जर्मनीच्या जॅन लेनार्ड स्ट्रफने बरेच झुंजवले. जोकोविचने ही लढत 7-6 (7-5), 6-2, 2-6, 6-1 अशी जिंकून दुसरी फेरी गाठली. त्याची पुढील लढत जपानचा वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेला तात्सुमा किंवा भारताच्या प्रज्नेश गुणेश्वरन यापैकी एकाशी होईल. प्रज्नेश व तात्सुमा यांच्यातील सामना सोमवारी पाऊस आल्याने तो मंगळवारी खेळविण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. प्रज्नेशने सलग पाचव्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविले आहे. याआधी त्याने विम्बल्डन, पेंच ओपन व यूएस ओपनमध्ये प्रमुख स्पर्धेत खेळला होता.
21 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या इराद्याने उतरलेल्या 38 वर्षीय फेडररने अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनवर 6-3, 6-2, 6-2 अशी सहज मात केली. तिसरे मानांकन असलेल्या फेडररची पुढील लढत क्वेनिन हॅलीस किंवा फिलिप क्रायनोविच यापैकी एकाशी होईल. त्याने ही स्पर्धा यापूर्वी सहा वेळा जिंकली असून त्यातील शेवटचे जेतेपद 2018 मध्ये मिळविले होते. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱया सित्सिपसने साल्वातोर कारुसोचा 6-0, 6-2, 6-3 असा धुव्वा उडविला. गेल्या वर्षी त्याने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी त्याने फेडररला चकित करून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले होते. त्याने गेल्या वर्षी मार्सेली, इस्टोरिल स्पर्धा जिंकल्या आणि वर्षअखेरीची एटीपी फायनल्स स्पर्धेचेही जेतेपद पटकावले.
वोझ्नियाकीचा सहज विजय
महिलांमध्ये माजी अग्रमानांकित डेन्मार्कच्या 29 वर्षीय कॅरोलिन वोझ्नियाकीने अमेरिकेच्या क्रिस्टी आहनचा 6-1, 6-3 असा फडशा पाडत दुसरी फेरी गाठली. या स्पर्धेनंतर ती निवृत्त होणार असल्याचे तिने याआधीच जाहीर केले आहे. तिने आजवर एकच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली असून 2018 मध्ये तिने येथील स्पर्धा जिंकली होती. एनबीए स्टार डेव्हिड ली याच्याशी ती विवाहबद्ध झाली असून कौटुंबिक आयुष्य जीवनासाठी निवृत्त होत असल्याचे तिने जाहीर केले होते.
अन्य एका लढतीत जागतिक अग्रमानांकित ऍश्ले बार्टीने दुसऱया फेरीत स्थान मिळविले. पण यासाठी तिला संघर्ष करावा लागला. तिने युक्रेनच्या लेसिया त्सुरेन्कोवर 5-7, 6-1, 6-1 असा विजय मिळविला. 1978 मध्ये ख्रिस ओनील या ऑस्ट्रेलियन महिलेने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर यजमान देशाच्या एकाही महिला टेनिसपटूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. ते दडपण बार्टीवर असणार आहे. पोलोना हरकॉग किंवा रेबेका पीटरसनशी तिच पुढील लढत होईल.
व्हीनसला गॉफचा धक्का, स्ट्रायकोव्हा पराभूत
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पदार्पण करणाऱया अमेरिकेच्या 15 वर्षीय कोको गॉफने आपल्याच देशाच्या अनुभवी व्हीनस विल्यम्सचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आणताना 7-6 (7-5), 6-3 असा विजय मिळविला. गॉफने विम्बल्डन स्पर्धेतही व्हीनसला हरविले होते. विम्बल्डनमध्ये तिने चौथ्या तर अमेरिकन ओपनमध्ये तिने तिसऱया फेरीपयत मजल मारली होती. तिची लढत रोमानियाच्या सोराना सिर्स्टियाशी होईल. सोरानाने बार्बोरा स्ट्रायकोव्हाचा 6-2, 7-6 (7-5) असा पराभव केला.
सेरेना, ओसाका दुसऱया फेरीत
विद्यमान विजेत्या जपानच्या नाओमी ओसाकाने दुसरी फेरी गाठताना झेक प्रजासत्ताकच्या मेरी बुझकोव्हाचा 6-2, 6-4 असा पराभव केला. तिची पुढील लढत चीनच्या झेंग सायसायशी होईल. झेंगने रशियाच्या पात्रता फेरीतून आलेल्या ऍथ कॅलिन्स्कायाचा 6-3, 6-2 असा पराभव केला. सेरेना विल्यम्सनेही दणक्यात सुरुवात करताना केवळ 58 मिनिटात पहिला सामना जिंकून दुसऱया फेरीत स्थान मिळविले. तिने रशियाच्या ऍनास्तेशिया पोटापोव्हाचा 6-0, 6-3 असा फडशा पाडला. ती ऑकलंडमधील स्पर्धा जिंकून येथे उतरली आहे. तीन वर्षांपूर्वी तिने येथील स्पर्धा जिंकली होती.
निराश झालेल्या शॅपोव्हॅलोव्हची पंचांविरुद्ध उर्मट भाषा
जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानावर असणाऱया कॅनडाच्या डेनिस शॅपोव्हॅलोव्हला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. या सामन्यावेळी त्याचा पंचाशी वादही झाला आणि त्याने रॅकेट रागाने फेकून दिली. त्याला हंगेरीच्या मार्टन फुक्सोविक्सने चुरशीच्या लढतीत 3-6, 7-6 (9-7), 6-1, 7-6 (7-3) असे नमवित दुसरी फेरी गाठली. तिसऱया सेटमध्ये एकतर्फी पराभव झाल्यावर निराशेच्या भरात त्याने रॅकेट फेकून दिल्यावर पंचांनी त्याला ताकीद दिली. पण चिडखोर स्वभाव असलेल्या डेनिसने पंचांना उलट उत्तर दिले. ‘मी कोणताही नियम मोडलेला नाही. माझी रॅकेट आहे. मी त्याचे काहीही करेन. तुम्ही कोण मला सांगणार. मी रॅकेट मोडलेली नाही. मोडलो असेन तर दंड करा. तुम्ही तुमचे काम व्यवस्थित करा,’ अशा उर्मट भाषेत त्याने पंचांना सुनावले. त्याच्या या वर्तनामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता बोलली जात आहे.