इस्लामाबाद / वृत्तसंस्था :
सेहवाग के सर पर जितने बाल नही, उतना मेरे पास माल है, अशा शब्दात पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरने विरेंद्र सेहवागचा समाचार घेतला. शोएबला भारतात पैसा कमवायचा असतो. त्यामुळे तो भारताची प्रशंसा करतो, असे सेहवाग मागे म्हणाला होता. त्या पार्श्वभूमीवर शोएब अख्तरने या मुद्याला हात घातला. अर्थात, हजरजबाबी सेहवाग यावर काय प्रत्युत्तर देतो, हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.
‘तुझ्या डोक्यावर जितके केस नाहीत, त्यापेक्षा माझ्याकडे जास्त पैसे आहेत. मला चाहत्यांचे अलोट प्रेम मिळते, हे तुला पचनी पडत नसेल तर मी ते समजू शकतो. शोएब अख्तर बनण्यासाठी मी 15 वर्षे खर्ची घातली आहेत. हो. भारतात माझा स्वतंत्र चाहता वर्ग आहे. पण, ज्यावेळी भारतीय संघ व्यवस्थित खेळत नसेल तर मी त्यांच्यावर टीकाही करतो’, असे अख्तर यूटय़ूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हीडिओत म्हणाला.
शोएब अख्तरला युटय़ूब चॅनेलवर बराच चाहतावर्ग असून तेथे तो सातत्याने व्हीडिओ शेअर करत असतो. रावळपिंडी एक्स्प्रेस या नावाने ओळखल्या जाणाऱया या माजी जलद गोलंदाजाने भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट स्थितीवर भाष्य करणारा एक व्हिडिओही पोस्ट केला होता.
‘भारतीय संघ जागतिक क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी आहे आणि विराट कोहली फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी आहे. त्यामुळे भारतीय संघाची प्रशंसा सर्वच खेळाडू करतात. भारतीय संघ उत्तम प्रदर्शन साकारतो, त्यावेळी रमीज राजा, शाहिद आफ्रिदी हे देखील याची दखल घेतात. त्यामुळे, क्रिकेटविषयक मुद्यावर मी माझे मत नोंदवतो, त्यावेळी अशा लोकांना काय आक्षेप असतो, हे मला उमजत नाही. पाकिस्तानतर्फे मी 15 वर्षे खेळलो आहे. मी फक्त युटय़ूबसाठी प्रसिद्ध नाही. मी जागतिक स्तरावरील सर्वात जलद गोलंदाज होतो, याचे भान ठेवावे’, असे शोएब अख्तर सेहवागचा समाचार घेताना पुढे म्हणाला.
शोएबने पाकिस्तानकडून 46 कसोटी, 163 वनडे व 15 टी-20 सामने खेळले आहेत. याशिवाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम देखील त्याच्या खात्यावरच आहे.