दिल्ली न्यायालयाचा तिहार कारागृहास आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निर्भया सामूहिक बलात्कार व खूनप्रकरणातील आरोपींना 1 फेबुवारीला दिली जाणारी फाशीची शिक्षा पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. शिक्षेची अंमलबजावणी पुढील आदेश येईपर्यंत करू नये, असा आदेश शुक्रवारी पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने दिला. नियम 836 नुसार एखाद्या आरोपीची दया याचिका प्रलंबित असले तर फाशीची शिक्षा देता येत नाही, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, फाशीच्या शिक्षेपासून बचाव करण्यासाठी दोषींची धडपड सुरू असल्याचे निर्भयाच्या कुटुंबाच्या वतीने युक्तिवाद करणाऱया वकिलांनी यावेळी सांगितले.
निर्भया प्रकरणातील अक्षयकुमार सिंह, पवनसिंह, विनय शर्मा याणि मुकेशकुमार सिंह या दोषी आरोपींना फाशीची शिक्षा 22 जानेवारीला देण्यात यावी, असा आदेश दिल्ली न्यायालयाने दिला होता. यानंतर फाशीची तारीख 1 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली. यानंतर कायद्यातील तरतुदींचा टप्प्याटप्प्याने वापर करत फाशी टाळण्यासाठी नराधमांची धडपड सुरू झाली. बुधवारीच मुकेश याने राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.
बचावसाठी असणाऱया सर्व पयार्यांचा वापर केलेला नाही. त्यामुळे फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी आरोपी विनय शर्मा याने पटियाला हाऊस न्यायालयात केली होती. यावर शुक्रवारी सुनावणी झाली. आरोपी विनय शर्मा याची दया याचिका अद्याप प्रलंबित आहे. मुकेश सिंह याच्याकडील सर्व पर्याय संपले आहेत. त्यामुळे अन्य तीन आरोपींना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकते, असे तिहार कारागृहाच्या वतीने इरफान अहमद यांनी सांगितले. तर सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका फेटाळली आहे. विनय शर्मा याची राष्ट्रपतींकडे दया याचिका सादर करण्याची इच्छा असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. नियम 836 नुसार एखाद्या आरोपीची दया याचिका प्रलंबित असले तर फाशीची शिक्षा देता येत नाही, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी स्पष्ट केले.
‘सर्वांना एकाच वेळी फाशीचा नियम’
1981 मध्ये एका प्रकरणात तिघा दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. यातील दोघा आरोपींना राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली. ती ग्राहय़ मानून त्यांची फाशीची शिक्षा रद्द झाली. मात्र या प्रकरणात दया याचिका दाखल न केलेल्या आरोपीला फाशी देण्यात आली. एकाच प्रकरणात वेगवेगळा न्याय झाला. तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दोषी असणाऱया आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी एकाचवेळी करावी लागले, असे स्पष्ट केले आहे, असे आरोपी मुकेश सिंह याच्या वतीने युक्तिवाद करणाऱया वकील वृंदा ग्रोव्हर यांनी सांगितले. मुकेश सिंह याच्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याच्या वकिलाचा युक्तिवाद करण्याचा प्रश्नच येत नाही, असे निर्भयाच्या कुटुंबाच्या वकिलांनी यावेळी सांगितले.