जलशुद्धीकरण प्रकल्पप्रकरणी कारवाईसाठी डॉ. दिनेश नाशीपुडी यांचे आंदोलन
प्रतिनिधी/ बेळगाव
बसवणकोळ्ळ जलशुद्धीकरण प्रकल्पात बसविलेल्या ‘स्काडा’ स्वयंचलित यंत्रणेच्या कामात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. याबाबत झालेल्या चौकशीत भ्रष्टाचाराची बाब निदर्शनास आली असून महापालिका आणि प्रशासनाकडून भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱयांवर कारवाई करावी, याकरिता माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी बर्फाच्या लादीवर झोपून अनोखे आंदोलन केले.
या प्रकरणात गुंतलेल्या अधिकाऱयांवर कारवाई करावी या मागणीकरिता महापालिका कार्यालयासमोर अनोखे आंदोलन छेडून प्रशासनाला एकप्रकारे इशारा दिला. मंगळवारी सकाळी महापालिका कार्यालयासमोर बर्फाच्या लादीवर काही वेळ झोपून कारवाईची मागणी केली. याबाबत कोणतीच कारवाई झाली नसल्यास हेच आंदोलन तीव्र करू. या आंदोलना दरम्यान बर्फाच्या लादीवर झोपल्यानंतर कोणतीही समस्या उद्भवल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा डॉ. नाशीपुडी यांनी दिला.
अत्याधुनिक पद्धतीने जलशुद्धीकरणासाठी बसवणकोळ्ळ जलशुद्धीकरण केंद्रात स्काडा यंत्रणा बसविली होती. पण ही यंत्रणा अद्यापही कार्यान्वित केली नाही. ही यंत्रणा बसविण्यासाठी 3 कोटी 48 लाखांची तरतूद करून निविदा काढण्यात आल्या होत्या. पण ही यंत्रणा बसविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी यांनी महापालिकेच्या बैठकीत केला होता. दि. 4 जानेवारी 2019 रोजी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत याबाबत जोरदार चर्चा झाली होती. 3 कोटी 48 लाख रुपये खर्चून बसविलेली ही यंत्रणा कुचकामी असून, खर्च केलेला निधी वाया गेल्याचा आरोप डॉ. नाशीपुडी यांनी केला होता. याची चौकशी करून संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे महापालिका आयुक्तांसह पाणीपुरवठा मंडळ आणि मनपा अभियंत्यांची नियुक्ती करून स्काडा यंत्रणेच्या कामकाजाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा ठराव सभागृहात केला होता.
सभागृहाच्या निर्णयानुसार तत्कालीन महापालिका आयुक्त शशीधर कुरेर, शहर अभियंते आर. एस. नायक, पाणीपुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंते सी. एल. चंद्रप्पा व साहाय्यक कार्यकारी अभियंते हळ्ळीकेरीमठ, मनपाचे मुख्य लेखाधिकारी रामप्पा हट्टी यांनी दि. 28 फेब्रुवारी 2019 रोजी बसवणकोळ्ळ जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली होती. सदर कामाची माहिती घेतली असता, लाखो रुपये खर्चून अनावश्यक साहित्य खरेदी केल्याचे चौकशीदरम्यान निदर्शनास आले होते. झालेल्या कामाची पाहणी करून याबाबतचा अहवाल समितीने तत्कालिन मनपा प्रशासक व प्रादेशिक आयुक्त अमलान बिस्वास यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. पण याबाबत शासनाकडून अद्याप कोणतीच कार्यवाही हाती घेतली नाही. पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी बेळगाव दौरा करून बसवणकोळ्ळ प्रकल्पाची पाहणी केली होती. पण त्यांनीदेखील याबाबत कोणतीच दखल घेतली नसल्याचा आरोप डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी केला आहे. या आंदोलनावेळी उत्तर विभागाचे शहर अभियंते गंगाधर यांनी डॉ. नाशीपुडी यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. याबाबत वरि÷ांना माहिती देण्यात येईल, असे सांगितले.
आश्रय योजनेंतर्गत व आंबेडकर योजनेंतर्गत निर्माण केलेल्या वंटमुरी कॉलनी आणि रुक्मिणीनगरमधील घरे खराब झाली आहेत. झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत सदर घरे बांधून देण्याची तयारी दर्शविली आहे. याकरिता महापालिकेकडून ना हरकत दाखला मिळणे आवश्यक आहे. पण सदर दाखला देण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला. ना हरकत दाखला तातडीने देण्यात यावा, अशी मागणीदेखील या आंदोलनावेळी डॉ. नाशीपुडी यांनी केली.