श्रीनगर
जम्मू-काश्मीर प्रशासनाने बुधवारी पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सज्जाद गनी लोन आणि पीडीपी प्रमुख मेहबुबांचे निकटवर्ती मानले जाणारे वहीद पारा यांची दुपारनंतर नजरकैदेतून सुटका करण्यात आली. नजिकच्या काळात आणखी 13 नेत्यांची सुटका होण्याची शक्यता आहे.
जम्मू काश्मीर प्रशासनाने घाटीतील सुधारत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचे माजी आमदार आणि एका कामगार संघटनेच्या नेत्याची खबरदारीच्या कारणास्तव ठेवण्यात आलेल्या कोठडीतून सुटका केली होती. तर, गेल्या रविवारीही प्रशासनाने नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या चार नेत्यांची सुटका केली होती. यापूर्वी मुक्तता करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये माजी आमदार एजाज अहमद मीर यांचा समावेश होता. ते शोपिया जिल्हय़ातील वाची विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये निवडून आले होते. एजाज मीर यांच्या घरातून ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांचा सुरक्षारक्षक आदिल सात सरकारी बंदुका घेऊन दहशतवाद्यांशी मिळाला होता. तो गेल्या महिन्यात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत ठार झाला होता.