ऑनलाईन टीम / पुणे :
मूळ भारताची प्राचीन कला म्हणून ओळख असलेली वामन वृक्ष कला आणि नंतर बाहेरील देशात नावारूपास आलेल्या ‘बोन्साय’ या कलेमध्ये पुण्यातील प्राजक्ता काळे यांनी एक नवा आयाम रचला आहे. पुण्यातील बोन्साय मास्टर असलेल्या प्राजक्ता काळे आता बोन्सायमध्ये डॉक्टरेट मिळविणाऱया जगातील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.
फ्रान्समधील पॅरीस येथील युरोपियन आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून प्राजक्ता काळे यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. मलेशियामध्ये क्वालालुंपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात काळे यांनी स्वतः ही पदवी स्वीकारली.
या वेळी युरोपीयन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे (ईआययू) जागतिक प्रवर्तक डॉ. अजय देसाई, ईआययूचे आंतरराष्ट्रीय सल्लागार डॉ. परमेश्वरन, विद्यापीठाचे विश्वस्त रॉबर्ट ब्रँड, ईआययूच्या असील ऐतबायेवा, ईआययूचे महासंचालक डॉ. एडवर्ड रॉय प्रृष्णन, उद्योजक गिरीधर काळे आदि उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना काळे म्हणाल्या, युरोपियन आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून ही डॉक्टरेटची पदवी स्वीकारताना मला आनंद होत आहे. याबरोबरच या कलेच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली असल्याची मला जाणीव आहे. आज इंडोनेशिया, तैवान, चीन, जपान, बेल्जियम, इटली अशा अनेक देशांमध्ये बोन्सायकडे केवळ एक कला म्हणून न पाहता एक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे.
मात्र, भारतात अशी परिस्थिती नाही. त्यामुळे एक व्यवसाय निर्मिती करणारे क्षेत्र म्हणून त्याचा विकास व्हावा या उद्देशाने मी गेली 35 वर्ष काम करीत आहे. याद्वारे महिला व युवकांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याबरोबरच भारतात रोजगाराच्या आणखी संधी यातून कशा निर्माण होऊ शकतील यासाठी मी प्रयत्न करीत आहे. हे करीत असताना शासनाने याकडे रोजगार निर्मिती करणारी चळवळ म्हणून पहात प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे मला वाटते. याच दिशेने एक पाऊल म्हणून मी स्वतः बोन्साय या विषयाचा एक अभ्यासक्रम सुरू केला असून याद्वारे ही कला व रोजगाराची संधी येणाऱया नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मी योजना तयार केली आहे. याद्वारे तरुण पिढी बोन्साय या विषयाकडे लक्ष देत स्वावलंबनाने स्वतःचा विकास करू शकेल असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.