जगातील सर्व 195 देशांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. रविवार दुपारपर्यंत 6 लाख 77 हजार 660 रुग्ण आढळून आले असून 31737 जणांना या विषाणूच्या संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. तसेच या विषाणूच्या संसर्गापासून 146303 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. परंतु अमेरिकेत मात्र या विषाणूने 2229 जणांचा बळी गेला आहे. न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक 782 जणांना जीव गमवावा लागला असून 53 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) न्यूयॉर्क, न्यूजर्सी आणि कनेक्टिकटमध्ये लोकांना पुढील दोन आठवडय़ांसाठी अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगितले आहे.
कॅनडात 5655 रुग्ण
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पत्नी सोफी ग्रेगॉयर कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त झाल्या आहेत. ट्रुडो यांच्या कार्यालयाने 12 मार्च रोजी सोफी यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. लंडन येथून परतल्यावर सोफी यांना याची बाधा झाली होती. पंतप्रधान, त्यांची पत्नी आणि पूर्ण कुटुंबाला विलगीकरणाची प्रक्रिया राबवावी लागली होती. कॅनडात आतापर्यंत 5655 रुग्ण सापडले असून 60 जणांचा मृत्यू झाला आहे.
इटलीतील टाळेबंदी वाढणार
युरोप खंडात कोरोनाच्या बळींचा आकडा 20 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. तर इटली या देशात सर्वाधिक 10023 जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच एकूण रुग्णांची संख्या 92472 वर पोहोचल्याने तेथील सरकारने 9 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत टाळेबंदी लागू केली आहे. देशातील सुमारे 6 कोटी लोक या निर्णयामुळे स्वतःच्या घरात कैद आहेत. इटलीचे पंतप्रधन ग्यूसेफ कोंटे टाळेबंदीच्या मुदतीत आणखीन वाढ करण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानात संकट वाढतेय
पाकिस्तानच्या आरोग्य अधिकाऱयांनुसार देशात आतापर्यंत 1526 रुग्ण आढळून आले आहेत. तर पंजाब प्रांतात सर्वाधिक 558 रुग्ण सापडले आहेत. सिंधमध्ये 481, खैबर-पख्तूनख्यामध्ये 188, बलुचिस्तानात 138, गिलगिट-बाल्टिस्तानात 116, इस्लामाबादमध्ये 43 आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 2 रुग्ण असल्याचे समोर आले आहे. तेथे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात शनिवारी चीनमधून 8 वैद्यकीय पथके दाखल झाली आहेत.
स्पेनमध्ये 24 तासांत 838 बळी
स्पेनमध्ये 24 तासांमध्ये 838 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर एकूण बळींचा आकडा 6528 वर पोहोचला आहे. तर 14700 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तेथील एकूण रुग्णांचा आकडा 78798 वर गेला आहे. माद्रिद येथे 22000 तर कॅटालोनियात 15000 रुग्ण सापडले आहेत. तर 86 वर्षीय राजकन्या मारिया टेरेसा यांचा 26 मार्च रोजी पॅरिस येथे मृत्यू झाला आहे. जगभरातील कुठल्याही राजघराण्याच्या सदस्याचा कोरोना संसर्गामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधानांचे आवाहन
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. 27 मार्च रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी मिळाली होती. स्थिती सुधारण्यापूर्वी अधिकच बिकट होणार असल्याचे आम्ही जाणतो. संभाव्य स्थितीला सामोरे जाण्याची तयारी करत आहोत. नियमांचे पालन केल्यास बळींचा आकडा कमी होत लवकरच जनजीवन सुरळीत होऊ शकणार असल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे 17089 रुग्ण सापडले असून 1019 जणांचा मृत्यू झाला आहे.
न्युझीलंडमध्ये पहिला बळी
न्युझीलंडमध्ये शनिवारी कोरोनाने ग्रस्त 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महामारीचा देशातील हा पहिलाच बळी आहे. न्युझीलंडमध्ये रविवारी 63 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण रुग्णांची संख्या 514 वर पोहोचली आहे. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी महिलेच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत या संकटावर सर्वांनी एकत्र येत मात करावी लागणार असल्याचे म्हटले आहे. न्युझीलंडमध्ये 4 आठवडय़ांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.
फ्रान्समध्ये 15 एप्रिलपर्यंत टाळेबंदी
फ्रान्समध्ये आतापर्यंत 2314 जणांचा मृत्यू झाला असून 38 हजार 105 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. फ्रान्सने 1 अब्जापेक्षा अधिक फेस मास्कच्या पुरवठय़ाचा आदेश दिला आहे. देशात प्रत्येक आठवडय़ाला 40 कोटी मास्कचा वापर केला जात आहे. चीनमधून देखील मास्क मागविण्यात येणार असल्याचे फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिवियर वेरान यांनी सांगितले आहे. फ्रान्सने कठोर पावले उचलून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कंबर कसली आहे.
तुर्कस्तानात 7402 रुग्ण
तुर्कस्तानात कोरोनाचे 7402 रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी तेथे एकूण 7641 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर 108 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील आरोग्यमंत्री फहार्टिन कोका यांनी दिली आहे. तुर्कस्तानात कोविड-19 चा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी आढळून आला होता. तुर्कस्तानने आंतरराष्ट्रीय विमानसेवा रोखली आहे. तसेच देशांतर्गत विमानप्रवासाकरता एक दस्तऐवज अनिवार्य केला आहे.
इजिप्तने उचलली पावले
संयुक्त अरब अमिरातचे युवराज अल नाहयान यांच्याशी चर्चा केल्याची माहिती इजिप्तचे अध्यक्ष सिसी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. कोरोनाचा फैलाव रोखणे आणि त्यावर मात करण्यासाठी परस्पर सहकार्य वाढविण्याच्या उपायांवर दोघांनी चर्चा केली आहे. इजिप्तमध्ये 576 रुग्ण आढळले असून 36 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनासंबंधी वृत्त प्रकाशित केल्याने इजिप्तने गार्डियनच्या पत्रकाराची देशातून हकालपट्टी केली आहे.