बेलारूसच्या अध्यक्षांचा अजब सल्ला
रशियाला लागून असलेल्या बेलारूस या छोटय़ा देशाच्या अध्यक्षांनी स्वतःच्या विधानाद्वारे सर्वांनाच धक्का दिला आहे. अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांना व्होडका पिण्याचा आणि हॉकी खेळण्याचा सल्ला दिला आहे.
अलेक्झांडर यांनी सोमवारी देशाला संबोधित करत कोरोना संसर्गामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या उपचारासाठी व्होडका प्या, हॉकी खेळा आणि बानया (पारंपरिक सोनाबाथ) घ्या, सर्वकाही नीट होईल असेही त्यांनी सांगितले आहे. अलेक्झांडर सुमारे 1 कोटी लोकसंख्या असलेल्या बेलारूसमध्ये मागील 25 वर्षांपासून सत्तेवर आहेत.
फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
बेलारूसमध्ये कोरोनाचे 152 रुग्ण सापडले आहेत. खबरदारीच्या स्वरुपात तेथील सरकारने प्रवासावर बंधने लादली असली तरीही टाळेबंदीस नकार दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करत अलेक्झांडर यांनी रेस्टॉरंट, पार्क आणि बार बंद करण्याचे पाऊल उचललेले नाही. युरोपमध्ये सध्या एकच क्रीडा स्पर्धा सुरू असून ती बेलारूस फुटबॉल प्रीमियर लीग आहे. हॉकीचा सामना पाहण्यासाठी मैदानात जात अध्यक्षांनी क्रीडापटूंशी संवाद साधला आहे.
व्होडका सॅनिटायजरसारखेच
आइस हॉकी म्हणजे फ्रिजमध्ये राहण्यासारखे असून याहून सुरक्षित जागा असूच शकत नाही. बर्फ स्वतःच अँटी-व्हायरल औषध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. व्होडका एखाद्या सॅनिटायजरप्रमाणे काम करते. कोविड-19 विषाणू अधिक तापमानात जिवंत राहू शकत नसल्याने बानयाद्वारे तो संपविला जाऊ शकतो, असे ते म्हणाले.