अमेरिकेत असल्याने लॉकडाऊनमुळे मायदेशी परतणे झाले अवघड, पेंद्राचे प्रयत्न सुरू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हॉकी ऑलिम्पियन व 1975 मधील विश्वचषक विजेत्या हॉकी संघातील सदस्य अशोक दिवाण हवाई वाहतूक बंद असल्याने सध्या अमेरिकेत अडकले असून त्यांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्रालयाने त्यांना मायदेशी आणण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.
कोरोना महासाथीने जगभरातील अनेक देशांना विळखा घातला असल्याने अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे हवाई वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. 65 वर्षीय अशोक दिवाण यांची प्रकृतीही ठीक नसल्याने त्यांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. त्यामुळे त्यांनी प्रथम भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांना फोनवरून, उच्चपदस्थांना याबाबत माहिती देण्याची विनंती केली. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना त्यांचे पत्र मिळाले असून ते परराष्ट्र मंत्रालय खात्याकडे पाठवून दिले असल्याचे क्रीडा मंत्रालयाने सांगितले. ‘परिस्थितीचा आढावा घेऊन या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा, असे क्रीडामंत्र्यांनी संबंधित अधिकाऱयांना सांगितले आहे,’ असे मंत्रालयातील सूत्राने स्पष्ट केले.
ध्यानचंद पुरस्कार विजेत्या दिवाण यांनी प्रथम बात्रा यांच्याकडे मदतीसाठी संपर्क साधला होता. ‘गेल्या आठवडय़ात कॅलिफोर्नियातील हॉस्पिटलमध्ये मला तातडीने दाखल व्हावे लागले होते. मी आता अमेरिकेत अडकलो असून माझी तब्येतही बिघडली असल्याने मला तुमच्या मदतीची गरज आहे. इथे विमा संरक्षण नसल्याने वैद्यकीय खर्चही न परवडणारा आहे,’ असे दिवाण यांनी पत्रात लिहिले होते.
‘एअर इंडियाच्या विमानाने 20 एप्रिल रोजी मायदेशी परतण्याचे ठरले होते. पण कोरोना महासाथीमुळे ही तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. माझा हा निरोप क्रीडा मंत्र्यांपर्यंत पोहोच करावा आणि हॉस्पिटलशी संपर्क साधून सॅन फ्रान्सिकोसहून मायदेशी येण्याची व्यवस्था करावी,’ अशी विनंतीही त्यांनी या पत्रात केली होती.
मायदेशी परतल्यानंतर सर्व खर्च देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. ‘गेल्या डिसेंबरमध्ये ते सॅक्रेमेन्टो येथील मुलाकडे राहण्यासाठी गेले होते आणि 20 एप्रिल रोजी ते परतणार होते. पण ते आजारी पडल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले,’ अशी माहिती त्यांची मुलगी आरुषीने दिली. 1976 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.