प्रतिनिधी / बेळगाव
निर्जंतूकीकरण करण्यासाठी निर्जंतुकीकरण कोठडी उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. काही ठिकाणी निर्जंतुकीकरण कोठडी बसविण्यात आली आहे. मात्र सदर कोठडीत अल्कोहोल, क्लोरिन आणि लायसोल रसायनाचा स्पे करण्यात येत असल्याने नागरिकांना धोकादायक आहे. त्यामुळे निर्जंतूकीकरण कोठडी बसविण्यात येवू नये अशी सूचना सार्वजनिक आरोग्य आणि प्रतिबंधक औषध खात्याने केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच तोंडाला मास्क लावण्याची सूचना करण्यात येत आहे. पण बाजारपेठेसारख्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेतली जात नाही. भाजीमार्केट तसेच धान्य मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरण करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जिल्हा रूग्णालय, भाजी मार्केट आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण कोठडी उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. काही संस्थांच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण कोठडी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पण निर्जंतुकीकरणासाठी कोठडीमध्ये अल्कोहोल, क्लोरिन आणि लायसोल मिश्रीत पाण्याची फवारणी नागरिकांच्या अंगावर केली जाते. पण या रसायनांचा वापर नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक आहे. तसेच निर्जंतुकीकरणासाठी रसायनाची फवारणी करण्यात येत असल्याने नागरिक हात स्वच्छ धुण्याकडे दुर्लक्ष करित आहेत. त्यामुळे ही उपाय योजना योग्य नसल्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणि प्रतिबंधक औषध विभागाला दिली आहे. त्यामुळे चेन्नई येथील सार्वजनिक आरोग्य आणि प्रतिबंधक औषध विभागाने याबाबत पत्रक काढून विविध ठिकाणच्या आरोग्य खात्याला याबाबतची माहिती दिली आहे.