महत्वाच्या कामांना परवानगी दिली, तरी नियम पाळणे बंधनकारक -जिल्हाधिकारी
- आणखी सतराजणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
- पंधराजणांचे नमुने तपासणीसाठी मिरजला
- 41 व्यक्ती आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचाराखाली
- जिल्हय़ात 247 व्यक्ती होमक्वारंटाईन मुक्त
- 399 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
संचारबंदीमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक, अत्यावश्यक सेवा वाहतूक सुरूच राहणार आहे. काही महत्वाच्या कामांना सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पण, ही कामे करताना घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक असणार आहे, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले. जिल्हय़ात आणखी 17 जणांचे कोरोना तपासणीचे निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. तर जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांना होमक्वारंटाईन करण्याचे काम सुरूच असून 399 जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या 247 जणांना होमक्वारंटाईन मुक्त करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये कोरोनाबाधित एकही रुग्ण नसल्यामुळे जिल्हय़ात 20 एप्रिल पासून संचारबंदीमध्ये शिथिलता आणली जाईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत होती. मात्र राज्यभरातील कोरोनाचा वाढता फैलाव पाहता जिल्हय़ामध्ये संचारबंदीमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले. तसेच जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा या वाहतुकीलाच परवानगी देण्यात आली आहे, तर काही प्रमाणात महत्वाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये रस्ते, पूल बांधकामे यांना परवानगी देण्यात आली असली, तरी शासनाने घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आणखी 17 रिपोर्ट निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत मिरज येथे कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या आणखी 17 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर अजून 15 जणांचे रिपोर्ट येणे प्रलंबित आहेत. जिल्हा रुग्णालयाने मिरज येथे तपासणीसाठी आतापर्यंत पाठविलेल्या एकूण 175 नमुन्यांपैकी 160 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये एकमेव रुग्णाचा पॉझिटिव्ह नमुना आला होता. तोही रुग्ण आता बरा होऊन कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात आता एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. सोमवारी आणखी नऊ नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले असून एकूण 15 नमुन्यांचा अहवाल बाकी आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये सद्यस्थितीत 41 व्यक्ती दाखल आहेत. जिल्हय़ात आजपर्यंत 399 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये 72 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. 28 दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी संपलेल्या 247 व्यक्तींना होमक्वारंटाईन मुक्त करण्यात आले आहे.
दिवसभरात 1990 व्यक्तींची तपासणी
लॉकडाऊनच्या काळात जिल्हा रुग्णालयामार्फत 10 थालासेमिआ, 29 डायलेसीस आणि केमथेरपीच्या एका रुग्णास सेवा देण्यात येत आहे. कैदी, वृद्धाश्रम, मजूर कॅम्प या ठिकाणी असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले असून या पथकामार्फत नियमितपणे या ठिकाणी असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत सोमवारी 1990 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
दहा निवारा केंद्रांमध्ये 200 कामगारांची व्यवस्था
लॉकडाऊनमुळे जिल्हय़ात अडकलेल्या मजूर, बेघर व कामगार यांच्यासाठी जिल्हय़ात दहा कॅम्प उभारण्यात आले आहेत. जिल्हाभरातील या कॅम्पमध्ये सध्या 200 व्यक्तींच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. तसेच महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यासाठी तालुकानिहाय सामुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील 64 ठिकाणी अलगीकरण करण्यात आलेल्या 735 व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले आहे.
1935 मेट्रिक टन आंबा विक्रीसाठी
आंब्याच्या वाहतुकीसाठी कृषी अधीक्षक कार्यालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. सोमवारपर्यंत जिल्हय़ातून कृषी विभागाच्या माध्यमातून 1 हजार 935 मे. टन आंबा राज्याच्या विविध भागात विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे.
घरीच अलगीकरण 0399
संस्थात्मक अलगीकरण 0072
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0175
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0160
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0001
निगेटिव्ह आलेले नमुने 0159
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0015
विलगीकरण कक्षात दाखल 0041
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0000
शुक्रवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 1990