सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी घेतली बैठक
भिलवडी / वार्ताहर
भिलवडी तालुका पलुस येथे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील सोळा गावांमधील सुमारे दोनशे व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाय योजना कराव्यात ? शासनाच्या नियमांचे पालन करून आपले व्यवसाय कसे सुरू करावेत? याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी उपस्थित व्यापारी वर्गाला मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित असणाऱ्या व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू ठेवणार असल्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर व्यवसाय सुरू असताना शासनाच्या सर्व आदेशाचे पालन करून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून, दुकानासमोर गर्दी होणार नाही याची काळजी घेत, त्याचबरोबर मास्क, सॅयनिटायझर वापर करून तसेच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व त्या उपायोजना करून व्यवसाय सुरू ठेवणार असल्याची ग्वाही उपस्थित व्यापाऱ्यांनी दिली. सकाळच्या सत्रामध्ये भिलवडी येथील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. यामध्ये देखील शासन नियमाचे पालन करीत व्यापाऱ्यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत आपले व्यवसाय सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.