वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली आणि आंध्रप्रदेश सरकारने मद्यदरात 75 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही राज्यांच्या महसुलात घसघशीत वाढ होणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 40 दिवस देशभरातील मद्य दुकाने बंद होती. सोमवारपासून लॉकडाऊनच्या अटींमध्ये शिथिलता आल्यानंतर मद्य दुकाने सुरू झाली. आंध्रप्रदेशमध्ये सोमवारी 68 कोटी रुपयांची दारू विक्री झाली. या राज्यातील साडेतीन हजारपैकी सुमारे 2300 दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने रविवारी मद्यदरात 25 टक्के वाढ केली होती. यामध्ये आणखी 50 टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा मंगळवारी केली. दिल्लीमध्येही दारू खरेदीसाठी झुंबड उडत आहे. त्यामुळे येथेही मद्यदरात 75 टक्के वाढ करण्यात आली आहे.