नक्षलवाद्यांच्या लढाईत झाले होते शहीद
प्रतिनिधी / पंढरपूर
गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलिस उपनिरिक्षक धनाजी होनमाने हे आज अनंतात विलिन झाले. त्यांच्यावर पंढरपूर तालुक्यातील पुळूज याठिकाणी शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले आहे. प्रसंगी शहीद होनमाने यांचे बंधू विकास यांनी त्यांना मुखाग्नि दिला.
तालुक्यातील पुळूज हे गाव लिंगेश्वर देवस्थानामुळे प्रसिध्द आहे. कायमच या गावामधे हर हर महादेव असा जयघोष असतो. सोमवारी मात्र या संपूर्ण गावामधे ‘अमर रहे, अमर रहे धनाजी होनमाने अमर रहे’ असा जयघोष ऐकावयास मिळाला. सोमवारी दुपारी बारा वाजण्यांचा सुमारास शहीद पोलिस उपनरिक्षक धनाजी होनमाने यांचे पार्थिव गडचिरोली येथून त्यांच्या मूळगावी पुळूज याठिकाणी आले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. यशवंत माने, आ. भारत भालके यांनी आदरांजली वाहीली.
यानंतर शहीद होनमाने यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी घेउन जाण्यात आले. यावेळी त्यांच्या आई-वडीलांच्या भावनेचा बांधच सुटलेला दिसून आला. अशातच अनेकांनी त्यांचे अत्यंदर्शन घेतले. यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर त्यांचे अत्यंसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलिस उपअधिक्षक डॉ. सागर कवडे, उमेश परिचारक आदिंनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहीली.
यानंतर पोलिस दलांच्या वतीने विशेष मानवंदना देण्यात आली. तसेच पोलिस बॅण्डने देखिल यावेळी शहीद होनमाने यांना मानवंदना दिली. याप्रसंगी विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ वारके यांनी शासनाच्या आणि पोलिस दलांच्या वतीने शोकसंदेश वाचून दाखवला. यानंतर शहीद धनाजी होनमाने यांचे बंधू विकास होनमाने यांनी मुखाग्नि दिला. यानंतर ‘भारत माता की जय…’ शहीद धनाजी होनमाने अमर रहे… अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.
विशेष म्हणजे कोरोनामुक्तीचा लढा सध्या सुरू आहे. अशातच आपल्या गावच्या लाडक्या वीर सुपुत्राला निरोप देण्यासाठी शेकडो लोक सोशल डिस्टन्स राखून हजर होते.
राज्य शासनाकडून शहीद धनाजी होनमाने यांना आपण आदरांजली वाहीली आहे. तसेच शासनाकडून होनमाने कुंटुबियांना 1 कोटी 38 लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या बंधूला शासकीय सेवेत नोकरी व आई-वडीलांना पेन्शन देण्यात येणार आहे.
दत्तात्रय भरणे , पालकमंत्री , सोलापूर