वेतन मिळाले नसल्याने पवित्रा, बहुतांश ‘रोड गँग’मधील कामगार, सोपस्कार करून वेतन बँकेत जमा ः नगराध्यक्षांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी
मडगाव
मडगाव पालिकेच्या रोजंदारीवरील कामगारांना सोमवारपर्यंत वेतन बँकेत जमा केले जाईल असे आश्वासन नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी दिलेले असताना सोमवार सकाळपासूनच वेतन न मिळालेल्या कामगारांनी कामावर बहिष्कार घातला. मात्र वेतन बँकेत जमा करण्यात आले असल्याची माहिती नंतर नगराध्यक्षांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शुक्रवारपर्यंत वेतन बँकेत जमा न झाल्याने या रोजंदारीवरील कामगारांनी काम बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र नगराध्यक्षा नाईक यांच्या नजरेस हा प्रकार आल्यानंतर त्यांनी या कामगारांची समजूत काढून सोमवारी वेतन बँकेत जमा करण्याचे आश्वासन दिल्यावर हे कामगार कामावर रजू झाले होते.
मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी आजारी असल्याने रजा घेतली असून त्यांची सही राहून गेल्याने वेतन बँकेत जमा करण्यास विलंब झाल्याचे आपल्या नजरेस आणून देण्यात आले आहे. सोमवारी मुख्याधिकारी कामावर रजू होणार असून त्याच दिवशी हे वेतन या रोजंदारीवरील कामगारांना मिळेल याची आपण काळजी घेणार, असे नाईक यांनी त्यानंतर या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले होते.
मुख्याधिकाऱयांची रूजू झाल्यानंतर सही
सोमवारी सकाळी मुख्याधिकारी पंचवाडकर यांनी रजेनंतर पालिकेत उपस्थिती लावली असता सदर वेतनासंदर्भातील फाईलवर सही केल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. बँकेला सदर कागदपत्रे पाठविलेली असल्याने सोमवारी दुपार वा सायंकाळपर्यंत वेतन रोजंदारीवरील कामगारांच्या खात्यांवर जमा होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
बहुतांश रोड गँगचे कामगार
कामावर बहिष्कार घातलेल्या कामगारांमध्ये बहुतांश रोड गँगमध्ये काम करणाऱया कामगारांचा समावेश होता. एप्रिल महिन्यात रोड गँगमधील कामगार कामावर आले नव्हते. फक्त कचरा गोळा करणारे रोजंदारीवरील कामगार कामावर होते, अशी माहिती पालिकेच्या एका पर्यवेक्षकाने दिली.
या रोड गँगमधील कामगारांची हजेरी पुरविण्याची जबाबदारी पर्यवेक्षकांची असते. पण कामगार कामावर नसल्याने हजेरीपटावर लॉकडाऊनचा कालावधी असा उल्लेख आम्ही केला होता, असे या पर्यवेक्षकाने सांगितले. त्यांना वेतन द्यायचे की नाही हे ठरविण्याची जबाबदारी वरि÷ अधिकाऱयांकडे होती, असे त्याने नजरेस आणून दिले. यातील एका अधिकारपदावरील कर्मचाऱयाने सकाळी या रोड गँगमधील कामगारांना लॉकडाऊनच्या काळातील वेतन फेडण्यासाठी आवश्यक परिपत्रक सरकारकडून आले नसल्याचे सांगितल्याने त्यांनी कामावर बहिष्कार टाकला, असे सांगण्यात आले.
‘इन्सेंटिव्ह’ मिळाले नसल्याने कचरा उचलणारे कामगार नाराज
दरम्यान, य?ा रोड गँगमधील रोजंदारीवरील कामगारांना काम न करता एप्रिल महिन्याचे वेतन दिले जात असेल, तर आम्ही केलेल्या कामाच्या मोबदल्याचे काय, असा सवाल घरोघरी कचरा उचलणाऱया तसेच कचरावाहू ट्रकांवर काम करणाऱया रोजंदारीवरील कामगारांनी उपस्थित केला आहे. धोका पत्करून कचरा गोळा करत असल्याने 5 हजार रुपये इन्सेंटिव्ह म्हणून दिले जातील असे सांगण्यात आले होते. ते काही वेतनासोबत मिळाले नसल्याने या कामगारांनी नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱयांनी यात लक्ष घालून ही रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी उचलून धरली आहे.